साखरीनाटेत बेकायदेशीर मासेमारी

सामना ऑनलाईन। रत्नागिरी

साखरीनाटे परिसरात बंदीचा आदेश झुगारून मोठय़ा प्रमाणात पर्ससीन नौका मच्छीमारी करत आहेत. त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज साखरीनाटे येथील पारंपरिक मच्छीमारांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

३१ डिसेंबरनंतर पर्ससीन नेट नौकांना मच्छीमारीवर बंदी घालण्यात आली. मात्र सुमारे ६० हून अधिक पर्ससीन नौका साखरीनाटे परिसरात मच्छीमारी करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. वारंवार तक्रारी देऊनही कोणतीच कारवाई होत नसल्याची नाराजीही पारंपरिक मच्छीमारांनी व्यक्त केली. या पर्ससीन नेट नौकांवर कारवाई करून बेकायदेशीर मासेमारीवर आळा घालावा अशी मागणी मच्छीमारांनी निवेदनात केली आहे. बेकायदेशीर मच्छीमारीमुळे छोटय़ा मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येत आहे. मच्छीमारीचा हंगाम संपत येत असल्याने मच्छीमार आर्थिक विवंचनेत अडकला आहे. अशावेळी बेकायदेशीर मासेमारीवर कारवाई करावी अशी मागणी मच्छीमारांकडून होत आहे.