कथा…टेडीबेअर

नीलेश मालवणकर

न आवडणाऱया खेळण्यात सापडलेले आवडते टेडीबेअर

झोपेतून अचानक कविता जागी झाली तेव्हा तिला जाणवलं की तिची मामी तिला झाडूने बदडत होती. कविताची मामेबहीण… सुकन्या पुढे झाली. तिने कविताच्या मिठीतला मोठ्ठा टेडी बेअर हिसकावून घेतला तेव्हा कविताला आपल्या गुह्याची जाणीव झाली. घरात कुणी नसताना घरकाम करून थकलेली कविता सुकन्याच्या बेडरूममध्ये आली होती. तिथे बेडवर सुकन्याचा भलाथोरला टेडी बेअर होता. टेडीच्या मऊ स्पर्शाने हरखून कविताने टेडीला मिठी मारली. थकल्यामुळे तिचा डोळा लागला. ती जागी झाली ते मामीच्या झाडूच्या माराने. त्यानंतर पुन्हा कधी सुकन्याच्या टेडीला कविताने हात लावला नाही. आपल्याकडेसुद्धा एक टेडी बेअर असावा या इच्छेला तिने तिलांजली दिली.

आज नववधूच्या वेशात ती पलंगावर बसली होती, तेव्हा भूतकाळातल्या या कटू आठवणी ढवळून पुढे आल्या. हे लग्नसुद्धा तिच्या मनाविरुद्ध झालं होतं. तिला पुढे शिकायचं होतं. नवऱयाकडच्या ज्योतिष्याच्या सल्ल्यामुळे घाईतच लग्न ठरलं.

कविताचा आणि नवऱया मुलाचा… अशोकचा जोडा बराच विजोड होता. दोघेही दिसायला सर्वसाधारण. कविताची अंगकाठी बारीक, तर अशोक जाडजूड होता. तिची उंची पाच फूट, अशोक पावणेसहा फुटांपेक्षा मोठा होता. कविताला अशोकशी एकदा भेटून बोलायचं होतं, पण मामीने मोडता घातला होता.

कविताच्या डोळ्य़ांतून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. तेवढय़ात दरवाजा उघडला. दारातून अशोक आत आला. कविताच्या छातीची धडधड वाढली. अशोक पलंगावर तिच्या बाजूला येऊन बसला. हाताने घुंघट दूर करून त्याने कविताच्या चेहऱयाकडे पाहिलं. तिच्या गालावर सुकलेले अश्रू त्याला दिसले.

‘तू रडतेस?’

कविता काहीच बोलली नाही.

‘लग्न तुझ्या मनाविरुद्ध झालंय?’

‘अहं’…

तिचा हात आपल्या हातात घेऊन प्रेमळपणे दाबत त्याने विचारलं, ‘काय झालं? मला नाही सांगणार?’

कविता ढसाढसा रडत बोलू लागली. बोलणं संपलं तेव्हा तिला जाणवलं, ती बोलताबोलता त्याच्या कुशीत शिरली होती. आपण एका पुरुषाच्या कुशीत आहोत हे जाणवलं, तशी ती चटकन मागे सरली.

‘काळजी करून नकोस. मी तुला राणीप्रमाणे ठेवीन. तू पुढे शिकण्याला माझी काहीच हरकत नाही.’

कविताच्या चेहऱयावर बऱयाच वर्षांनी हसू परतलं.

‘…आणि उद्या सकाळीच दुकान उघडल्याबरोबर मी माझ्या राणीला एक मोठ्ठासा टेडी बेअर आणून देईन.’

‘नको. मला मिळालाय टेडी बेअर.’

‘कधी? कुठेय तो?’

‘हा काय माझ्याशी बोलतोय. भला मोठ्ठा लुसलुशीत टेडी बेअर,’ कविता अशोकच्या नजरेला नजर भिडवत म्हणाली आणि पुढच्याच क्षणी इवलीशी कविता तिच्या टेडी बेअरच्या मिठीत शिरली.