किस्से क्रिक्रेटपटूंच्या मायबोलीचे

क्रीडाप्रेमी

माणूस कितीही मोठा होऊ दे, जगाच्या पाठीवर कुठेही जाऊदे, उत्स्फूर्त भावना व्यक्त करण्यासाठी त्याला मायबोलीच लागते. सध्या द. आफ्रिकेत क्रिकेटपटूंची मांदियाळी जमली आहे. आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेत अजिंक्य रहाणेने अस्खलित मराठीतून उत्तरे देत आपला मराठी बाणा दाखवला आहे.

आपली मायबोली… कोणताही मनुष्य जेव्हा अत्यंत आरामात आणि खास त्याच्या वातावरणात असतो, तेव्हा तो कोणत्या भाषेत बोलतो…?

आपल्याला समोरच्याचा अत्यंत राग आलेला असतो. काय करावं सुचत नसतं… राग व्यक्त करायचं एकच माध्यम असतं… भाषा… मनापासून आलेला संताप कोणत्या भाषेत व्यक्त होतो…?

खूप मनापासून एखादी गोष्ट सांगायची असते… प्रसंगी भावनिक… एखादी मनःस्पर्शी आठवण… कोणती भाषा आठवते…?

आपसात सहकाऱयांमध्ये… अगदी जवळच्या मित्राबरोबर मस्त कल्ला करायचा असतो… अगदी धांगडधिंगा घालायचा असतो… कोणती भाषा…?

सातासमुद्रापार… परदेशात दौऱयानिमित्त अगदी व्यावसायिक पत्रकार परिषदेत प्राधान्याने मनापासून उत्तर कोणत्या भाषेतील प्रश्नाला द्यावंसं वाटतं?

या साऱयांचे उत्तर अगदी ठामपणे एकच आहे. आपली मायबोली… मातृभाषा… माणूस कितीही मोठा होऊ दे… कर्तृत्ववान जगप्रसिद्ध होऊ दे. मग मायबोलीतून बोलण्याचा… व्यक्त होण्याचा गोडवा… आनंद… आणि अभिमान काही निराळाच असतो. सध्या द. आफ्रिकेत क्रिकेटची मालिका सुरू आहे. सर्व दिग्गज क्रीडापटूंची अर्थात तिथे मांदियाळी भरली आहे.

सर्वसाधारणतः बहुतेक क्रिकेटपटू पत्रकारांशी संवाद साधताना किंवा सामना झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना इंग्लीशमधूनच बोलत असतात. मग भलेही इंग्लीश येवो अथवा न येवो… अर्थात यातील गमतीचा भाग सोडून देऊया. पण बऱयाचदा हे सामने आंतरराष्ट्रीय असल्याने येथे आंग्ल भाषेतूनच संवाद साधायला लागतो.

हीच गोष्ट रोहित शर्माची. रोहित पक्का मुंबईकर. उत्तम मराठी बोलणारा. अस्सल मुंबईची भाषा त्याच्या ओठावर असते. पत्रकार परिषदेत त्याला मराठीतून विचारले की त्याचीही गाडी मराठीतूनच सुरू होते. नुकतीच त्याने पृथ्वी शॉला मराठीतूनच शाबासकी दिली. अरे आम्ही ‘लटकलो’ वगैरे खास मराठी शब्द त्याच्या संभाषणात असतात.

राहुल द्रविड. अत्यंत शांत स्वभाव. पण जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो मराठीतूनच संवाद साधतो. आपल्या सहकाऱयाच्या यशात त्याला मनापासून आनंद झालेला असतो. आणि तो आनंद तो सहजच मराठीतून व्यक्त करतो.

सचिन क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांतही तितकीच रुची दाखवतो. नारायण कार्तिक फॉर्म्युला वन रेस जिंकला तेव्हा सचिनने त्याचे उत्स्फूर्तपणे मराठीतून कौतुक केले होते. ‘‘आपण मुंबईच्या रस्त्याने जेमतेम ४० ते ६० च्या गतीने गाडी चालवू शकतो, पण नारायण कार्तिकचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.’’

सुनील गावसकर. अजूनही पाय जमिनीवर घट्ट रोवून सर्व क्रिकेटपटूंना मार्मिक सल्ल्यांमधून बरेच काही शिकवून जात असतो. नुकताच त्याने एक प्रसंग एका जाहीर कार्यक्रमात सांगितला. १९७१ च्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी दौऱयासाठी सुनीलची निवड होणे अपेक्षित होते. सुनील सांगतो, मी दादर स्थानकावर उभा होतो. आज निवडीबद्दल समजणार होते. घाबरल्या मनानेच मी घरी पोहोचलो. समोर आई आली. मी तिचा चेहरा निरखत होतो. तिचा चेहरा निर्विकार होता. पण एक गोष्ट माझ्या नजरेतून सुटली नव्हती. तिच्या चेहऱयावर आनंद होता. पण ती तो दाखवत नव्हती. घरात शिरल्यावर विनू मंकडचा फोन आला. ते म्हणाले, तुझी निवड झाली आहे. मस्त खेळ. आता मी आईच्या चेहऱयाकडे पाहिले. तिच्या चेहऱयावर माझ्यापेक्षाही जास्त आनंद दिसत होता.

विराट कोहली मैदानात तर अगदी सहज हिंदी, पंजाबीतून बोलत असतो. चिडत असतो… आनंद व्यक्त करत असतो. हे त्याचे उत्स्फूर्त व्यक्त होणे खरेच अनुभवण्यासारखे असते.

क्रिकेटची रणनीती मैदानावर एकमेकांना सांगताना, सूचना देताना तर खास बोली भाषेचाच वापर केला जातो. खरी मजा येते ती पाकिस्तानविरुद्ध खेळताना. हिंदी त्यांना सहज समजते. अशा वेळी खेळाडूंची मायबोलीच कामाला येते… आणि अनेक योजना अक्षरशः मायबोलीतूनच राबवल्या जातात.

हे सर्व किस्से, पत्रकार परिषदा पाहिल्या की लक्षात येते, माणूस कितीही मोठा झाला, जगाच्या पाठीवर कोठेही गेला तरी जेव्हा उत्स्फूर्त व्यक्त व्हायचे असते तेव्हा हात आपल्या आईचाच धरला जातो… नाही का?

यावेळची द. आफ्रिकेची पत्रकार परिषद थोडी वेगळी ठरली ती अजिंक्य रहाणेच्या अस्खलित मराठी बोलण्याने… एका मराठी पत्रकाराने अजिंक्यला मराठीतून प्रश्न विचारला. एरव्ही इतका शांत दिसणारा तू आज मैदानात खेळताना एवढा आक्रमक कसा झालास… आज तुझे वेगळेच रूप पाहायला मिळाले. असंख्य आंग्ल पत्रकारांच्या गदारोळात हा मराठी प्रश्न टिपून अजिंक्यनेही अगदी अस्खलित मराठीत उत्तर दिले. ‘‘असंच राहायचं असतं. आपली आक्रमकता उगाचच समोर आणायची नसते. जेव्हा जरूर असेल तेव्हाच आक्रमक व्हायचे असते.’’

महेंद्रसिंह धोनी. जगाच्या पाठीवर कोठेही असो… त्याचे झारखंड, त्याची बोली यात तो मनापासून रमतो. एकदा एक सामना हरल्यानंतर पत्रकारांनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्या सर्वांना उत्तरं देताना आपल्या सहकाऱयांची बाजू सांभाळून घेताना धोनी इंग्लीशमधून बोलत असताना सहजच एक वाक्य हिंदीतून बोलून गेला ‘तील का ताड नहीं बनाते’.

सचिनचा अजून एक किस्सा त्याने अगदी मराठीतूनच सांगितलेला… मी बारा वर्षांचा असताना मुंबईकडून माझी निवड झालेली. पुण्यात तीन सामने होणार होते. काही पैसे आणि माझी सामानाची बॅग घेऊन मी पुण्याला गेलो. मैदानात चारच धावा केल्या आणि बाद झालो. ड्रेसिंग रूममध्ये येऊन खूप रडलो. दिवसभर पाऊस पडत असल्याने चित्रपट पाहणे आणि खाणे हेच करत होतो. लहान असल्यामुळे पैसे कसे खर्च करावे, साठवून ठेवावे काहीच समजत नव्हतं. मी सगळे पैसे खर्च केले होते. पुण्याहून रेल्वेने मुंबईला आलो. दादरला उतरलो. हातात मोठी बॅग होती. टॅक्सी करायला पैसेच उरले नव्हते. दादरपासून वांद्रय़ापर्यंत सामान हातात घेऊन चालत गेलो.