वादळी पावसाचा तडाखा! घरांचे पत्रे उडाले, झोपड्या कोसळल्या, उभी पिके आडवी

सामना प्रतिनिधी, धुळे

तालुक्याच्या पश्चिमेकडील भागात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. हवेचा दाब अचानक कमी झाल्याने उडाणे आणि खेडे परिसरात काही काळ गारपीट झाली. गारपिटीमुळे पपईच्या क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक घरांचे पत्रे उडाले तर कष्टकऱ्यांच्या झोपडयाही कोसळल्या. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने कपाशी, बाजरी, मका, पपई ही पिके अक्षरशः जमिनीवर झोपली. भाद्रपदाच्या उन्हाच्या तडाख्यात लवकरच कपाशीच्या बोंडामधून कापूस बाहेर येणार होता. अशा परिस्थितीत होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे शेतकऱ्यांवर कोसळलेल्या या आसमानी संकटाने पुन्हा एकदा कोंडी झाली आहे.

जिल्हय़ात यंदा सरासरीपेक्षा जवळपास शंभर मिलिमिटर पाउस कमी झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले. अशी परिस्थिती असली तरी तालुक्याच्या पश्चिम भागातील मेहेरगाव, कावठी, नवलाणे, नेर, मोराणे, उडाणे आणि मोराणे या भागात वेळोवेळी पिकांची गरज असतांना कमी-अधीक का होईना पाउस झाला. त्यामुळे पिकांची वाढ बऱ्यापैकी झाली होती. मेहेरगाव, नवलाणे, कावठी, उडाणे, मोराणे या भागात वेळोवेळी पाउस झाल्याने कपाशीसह अन्य पिके जोमाने वाढली. वेळोवेळी रासायनिक खते आणि किटकनाशकांचा उपयोग झाल्याने कपाशी चांगलीच बहरली होती. पण, रविवारी अचानक वातावरणात बदल झाला आणि सुमारे अर्धा तास सोसाट्याचा वारा वाहिला. यामुळे कपाशीसह मका, बाजरी ही पिके जमिनीवर झोपली. वादळी वारा होत असतांना काही प्रमाणात हलकासा पाउसही झाला. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, पाच फुटापुढील माणुस नजरेस येणे कठीण होते.

वादळी वारा संपल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतांकडे धाव घेतली. शेतीची स्थिती पाहिल्यानंतर होत्याचे नव्हते या म्हणीचा अनुभव अनेकांना आला. आडवी पडलेली पिके पाहून अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले आहे. त्यामुळे महसुल विभागाने तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तालुक्यातील उडाणे आणि खेडे परिसरातील प्रगतीशिल शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षापासून फळबागा निर्माण केल्या आहेत. पपईचे पीक काढणीवर असतांनाच वादळी वारा आणि गारपीटमुळे नुकसान झाले. वाऱ्यामुळे पपई शेतातच आडवी झाली. गारपीटचा मारा झाल्याने तेथे लगडलेल्या पपईचा खच जमिनीवर पडला. वाऱ्याला मोठय़ा प्रमाणात वेग असल्याने अनेक घरांचे पत्रे उडाले तर कष्टकऱ्यांच्या झोपड्या कोलमडल्या. माळराण आणि शेतीच्या बांधावरील झाडे उन्मळून पडली. काही क्षेत्रातील विजेच्या तारा तुटल्या. तर खांब देखील कोसळले.