‘या’ घटनेनंतर एमा स्लेड नोकरी सोडून बनल्या भिख्खू!

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जीवनात काही घटना अशा घडतात की जग क्षणभंगूर असल्याचा साक्षात्कार होतो आणि माणूस सर्वकाही सोडून विरक्ती पत्करतो. त्या एका घटनेने व्यक्तीचे जीवनच बदलून जाते. बँकेत नोकरी करणाऱ्या एमा स्लेड यांनाही असाच अनुभव आला. त्यानंतर गलेलठ्ठ पगाराची नोकरी, मान,सन्मान आणि संपत्तीवर पाणी सोडून त्या बौद्ध भिख्खू बनल्या. ‘ रॉब रिपोर्ट लिमिटेड 2018’ या कार्यक्रमात त्यांनी बँक कर्मचारी ते बौद्ध भिख्खूपर्यंतचा प्रवास कसा झाला याची माहिती दिली.

बँकेच्या नोकरीत मोठा पगार, मान सन्मान सर्वकाही मिळाले होते. आयुष्यातील बराचकाळ मी या नोकरीसाठी दिला होता. एकदा कामानिमित्त जकार्तामध्ये गेले होते. तेथील हॉटेलमध्ये माझ्या खोलीत थांबली होती. त्यानंतर स्वप्नातही विचार केला नव्हती अशी गोष्ट घडली. हॉटेलमध्ये काही दरोडेखोर घुसले त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत मला ओलीस ठेवले. आता आपला जीव वाचत नाही, दरोडेखोर आपल्याला मारणार अशी भीती मला वाटली. मात्र, पोलिसांनी सुरक्षितपणे मला दरोडेखोरांच्या तावडीतून सोडवले. या घटनेनंतर मी अंतर्मुख झाले. जग क्षणभंगूर असल्याची जाणीव झाली आणि जीवनाचे सत्य शोधण्य़ासाठी नोकरी घर-दार सर्व सोडण्याचा निर्णय घेतला असे एमा यांनी सांगितले. निर्णयाचा हा क्षण महत्वाचा असल्याचे त्या म्हणाल्या.

नोकरी घरदार सोडल्यावर हिमालयात एका आध्यात्मिक गुरूची एमा यांनी भेट घेतली. त्या गुरूंच्या सल्लानुसार त्यांनी भिख्खू बनण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेणे कठीण गेले का असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, मी काही सोडले आहे, असे मला वाटत नाही. मला जे हवे होते ते गवसत आहे असे वाटते. माझ्या आत्म्याचे शुध्दीकरण होत आहे, असे एमा म्हणाल्या. आज जर कोणी तुम्हाला बंदुकीचा धाक दाखवला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल यावर स्मितहास्य करत त्या म्हणाल्या, मला खूप मोकळे वाटेल. मात्र, हीच घटना आधी घडली असती तर मी निश्चितच घाबरली असते. एका निर्णयाने माझे आयुष्यच बदलून गेले आहे, असे एमा यांनी सांगितले.