पनौती कोण आहे? पाकिस्तानच्या क्रिकेटपटूचा सवाल!

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसच्या पराभवावर राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर याची चर्चा सुरू आहे. तसेच अनेकांनी काँग्रेसला टोमणे मारायला सुरुवात केली आहे.

आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया (Danish Kaneria) यानेही हिंदुस्थानातल्या निवडणुका आणि काँग्रेसचा पराभव यावर प्रतिक्रिया दिली आहे. दानिशने कोणाचेही नाव न घेता त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्वीट करत पनौती कोण आहे? असा सवाल केला आहे. त्यामुळे हे ट्वीट प्रंचंड वायरल होत आहे.

विधानसभा निवडणुकीदरम्यान क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला होता. या सामन्यात हिंदुस्थानी संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. टीम इंडियाच्या पराभवानंतर ट्विटरवर अचानक पनौती हा शब्द चांगलाच ट्रेंड झाला होता. याच शब्दाचा पुनरुच्चार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या प्रचारसभेत केला होता.

राजस्थान येथे विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना काँग्रेसच्या प्रचारसभेत राहुल गांधी बोलत होते. यावेळी ते एका भाषणात म्हणाले, टीम इंडियाचे खेळाडू जिंकू शकले असते, पण पनौती लागली आणि ते हरले. यानंतर काँग्रेस पक्षातील सर्व बड्या नेत्यांनी पीएम मोदींसाठी पनौती हा शब्द वापरण्यास सुरुवात केली.त्यामुळे आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप समर्थकांनी सोशल मीडियावर काँग्रेसच्या पराभवावर टीका केली आहे. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आता सांगा पनौती कोण? असा सवाल उपस्थित करत आहेत.

सध्याच्या निकालानुसार मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या खात्यात 160 जागा आणि काँग्रेसच्या खात्यात 67 जागा आहेत. तर राजस्थानमध्ये भाजप 109 जागांवर आघाडीवर आहे. 74 जागा काँग्रेसला आणि 16 इतरांना जाण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या 90 जागा असलेल्या छत्तीसगडमध्ये भाजपला 55 जागांवर, काँग्रेसला 33 आणि इतरांना 2 जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. तेलंगणामध्ये काँग्रेस 65 जागांवर आघाडीवर आहे. तर BRS सध्या 42 जागांवर आघाडीवर आहे.