गोरखपूरमध्ये पुन्हा बालमृत्यूकांड, ७२ तासात ३० बालकांचा मृत्यू

सामना ऑनलाईन। लखनौ

उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर येथे बीआरडी रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरुच असून गेल्या ७२ तासात ३० बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बालकांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्यापपर्यत समजलेले नाही. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने जवळपास ७० बालकांचा तडफडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली होती.

रुग्णालयाने ऑक्सिजन पुरवणाऱ्या कंपनीची बिल थकवल्याने पुरवठादाराने रुग्णालयाचा ऑक्सिजन पुरवठा बंद केला होता. यामुळे बालकांना आपले प्राण गमवावे लागले होते. यावरुन उत्तर प्रदेश सरकार अडचणीत आले होते. त्यानंतर बालकांच्या मृत्यूप्रकरणी ऑक्सिजन पुरवठादार कंपनी पुष्पा सेल्स आणि ऑक्सिजन युनिटचे प्रमुख डॉक्टर सतीश यांना जबाबदार ठरवण्यात आले होते. याप्रकरणी बालरोगतज्ञ डॉक्टर काफील खान यांना अटक करण्यात आली.

त्यानंतर राज्य सरकारने सर्व आवश्यक कारवाया केल्याचे आश्वासन दिले. पण गेल्या ७२ तासात ३० बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने या रुग्णालयात अजूनही बालकांच्या मृत्यूचे सत्र सुरुच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. योगी सरकार आता काय करणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.