स्ट्रॉबेरीच्या शेतीतून बनले लखपती

पंजाबमध्ये बहुतांश शेतकरी धान आणि गव्हाचे पीक घेतात, मात्र गेल्या काही वर्षांत तिथे शेतीचे वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. फरीदकोटच्या मानीसिंहवाला या छोटय़ा गावात राहणारे प्रदीप सिंह आणि त्यांच्या पत्नीने कमाल केली आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी स्ट्रॉबेरीच्या शेतीला सुरुवात केली होती. आता दर सहा महिन्यांनी त्यांना या पिकातून 5 लाख रुपयांचा नफा मिळू लागलाय.

प्रदीप सिंह यांच्या मनात जेव्हा स्ट्रॉबेरीची शेती करायचा विचार आला, तेव्हा जिथे स्ट्रॉबेरी जास्त प्रमाणात पिकते तिथे पोचायचे त्यांनी ठरवले त्याप्रमाणे ते पुण्यात आले. स्ट्रॉबेरीच्या शेतीविषयी माहिती घेतली आणि काही रोपे विकत घेतली. शेताच्या छोटय़ाशा भागात ही रोपे लावली तरी चांगले पीक येते. त्यामुळे त्यांनी स्टॉबेरीची शेती करायचे ठरवले. प्रदीप सांगतात, या कामात पत्नी कुलविंदर कौरची खूप मदत होते. ती चांगल्या पद्धतीने स्ट्रॉबेरीचे पॅकिंग करते. मी बाजारात सगळा माल घेऊन जातो आणि विकतो. एकूण खर्च निघून 5 लाख रुपयांपर्यंत नफा होतो.