कर्जमाफीसाठी संभाजीनगरातील गावाला कुलूप

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, खरीप हंगामासाठी कर्ज द्यावे, यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी स्वयंस्फूर्तीने आंदोलन करीत आहेत. तालुक्यातील आडगाव सरक येथील ग्रामस्थांनी घरांना कुलूप लावून चूल बंद ठेवून मंदिरासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात गावातील अबालवृद्धांनी सहभाग घेतला. कर्जमाफीसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

संभाजीनगर तालुक्यातील आडगाव सरक हे ६०० उंबऱ्यांचे आणि ३ हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावातील प्रत्येक शेतकऱ्यावर कर्ज आहे. कर्जमाफी दिली जात नसल्यामुळे गावातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कर्जमाफी त्वरित मिळावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, खरीप हंगामासाठी कर्ज मिळावे या मागण्यांसाठी गावातील शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही राजकीय पक्षाचे सहकार्य न घेता स्वयंस्फूर्तीने शेतकऱ्यांनी एकदिलाने कुटुंबासह गाव बंद ठेवण्यासाठी आज गुरुवारी सकाळी १० वाजता चूल बंद ठेवून सर्व घरांना कुलूप ठोकून मंदिरावर ठिय्या आंदोलन सुरू केले. ‘कर्जमाफी मिळालीच पाहिजे’, ‘कर्जमाफी आमच्या हक्काची – नाही कुणाच्या बापाची’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कर्जमाफीसाठी लहान मुले, महिला, वृद्धमंडळी देखील मंदिराच्या ओट्य़ावर येऊन बसली. गावात सन्नाटा पसरला. किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, सलून, दवाखाने बंद ठेवण्यात आले होते. तब्बल ६ तास हे आंदोलन सुरू होते. सरपंच किशोर पठाडे, रामदास पठाडे, बाबासाहेब डुगले, तात्याराव डुगले, भावलाल रिठे, बाबासाहेब मोकळे, अंबादास रगडे, निवृत्ती पठाडे, संतोष पठाडे, कृष्णा मोकळे यांच्यासह ग्रामस्थांनी आंदोलन करण्यास पुढाकार घेतला.