महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्यास प्रखर विरोध – नितीन भोसले

1

सामना प्रतिनिधी । परभणी

एकिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीष महाजन हे महाराष्ट्राच्या हक्काचे एक थेंबही पाणी गुजरातला देणार नाही, असे सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र संपूर्ण राज्याला आंधारात ठेवून ४६ टी.एस.सी. पाणी गुजरातला देण्याची तयारी करण्यात आली आहे. ऐवढेच नव्हे तर प्रधान सचिवांनी १ एप्रिल रोजी पत्र दिले असल्याचे सांगत महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्यास सर्व पक्षीय नेत्यांनी प्रखर विरोध केला असल्याचे प्रतिपादन माजी आमदार नितीन भोसले यांनी पत्रकार परिषदेत केले.

यावेळी अविनाश पवार, शाहू भोसले, जय व्यवहारे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी आमदार भोसले पुढे म्हणाले, ‘पाणी यात्रा’ एक जनआंदोलन असल्याचे सांगीतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर गुजरातला पाणी देण्याची योजना आखत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. गोदावरी खोरे समृद्ध करणारी योजना महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यावर अवलंबून असताना मुख्यमंत्री मात्र गुजरातला ४६ टी.एस.सी. पाणी देऊन उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा वाळवंट करत आहेत. नाशिकच्या पश्चिमेकडील पाणी महाराष्ट्राचे, धरण बांधण्यासाठी जमीन महाराष्ट्राची धरणग्रस्ताचे प्रश्न महाराष्ट्राचे केवळ पाणी मात्र गुजरातला जाणार, अशी मानसिकता ठेवून निर्णय घेतले जात आहेत. दुष्काळ भागाच्या दौऱ्यावर असणाऱ्या सर्व पक्षीय नेत्यांनी प्रथम महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्यासाठी विरोध करावा, असेही आवाहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच घेतलेल्या एका प्रचारसभेत महाराष्ट्राच्या जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय एक थेंबही पाणी गुजरातला देणार नाही. तसेच २० जुलै २०१७ रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्राला गुजरातला पाणी देण्यास परवानगी देणारे पत्र दिले आहे. गुजरातला पाणी देणे म्हणजे केंद्र सरकारला पर्यायाने पंतप्रधान मोदी व अमित शहा यांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री हक्काचे पाणी देत असल्याचा आरोप यावेळी केला. शासनाने महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरात सरकारला देऊ नये, यासाठी पाणीयात्रा या जनआंदोलनाच्या माध्यमातून हा विषय सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. पाण्यासाठी संघर्ष करणारे जिल्हे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामधील पाण्यासाठी होरपळणाऱ्या नागरिकांतपर्यंत पाण्याचा विषय पोहचविण्यासाठी पाणी यात्रा दौरे करणार असल्याचे यावेळी भोसले यांनी स्पष्ट केले.