बदलीची नोकरी, घर… संसार

290

परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते

sujata-patilमी मूळची कोल्हापूरची. मुंबईत गेली एकोणतीस वर्षे नोकरी केली आणि गेले दीड वर्ष हिंगोली येथे आहे. या काळात मुंबईतच वेगवेगळ्या ठिकाणी बदली झाली. मात्र हिंगोलीनिमित्त पहिल्यांदाच एवढय़ा दूर जावं लागलं. माझं संपूर्ण कुटुंब मुंबईत असतं. त्यांची देखरेखीची तर मी व्यवस्था केली आहे, माझ्या मुलांसाठी मी त्यांच्याजवळ असणं  ही तितकच महत्वाचं. पण, आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे असेल तर अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. कुटुंबासाठी १५ दिवसांतून एकदा वेळ काढते. ज्या परिसरात असते तिथून ८० किलोमीटर लांब गाडी पकडायला यावे लागते. गाडीतून पुन्हा १४ तासांचा प्रवास. म्हणजे १६-१७ तासांचा प्रवास करून मुलांना मुंबईत भेटायला यावे लागते. त्यानंतर पुन्हा त्यांच्यासाठी १५ दिवसांचे नियोजन करावे लागते. मग पाणावलेल्या डोळ्यांनी कुटुंबाचा निरोप घ्यावा लागतो. अशा स्थितीतही माझ्या कामात माझे कुटुंब कधी आड आले नाही. त्यांच्यासाठी एवढे तर मी करूच शकते. कर्तव्य बजावत असताना या सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. पण याचा अर्थ कुटुंबाची आठवण येत नाही असे होत नाही. त्यांची आठवण तर क्षणोक्षणी येत असते.

हिंगोलीत विविध गावांना भेट देते, महिलांचे मेळावे घेतले आहेत, शाळा-कॉलेजांना भेटी देऊन प्रबोधन करते, शेतकऱ्यांना प्रबोधन करते.  शिवाय येथे कुटुंबं नसल्याने तिथली लोकच माझे कुटुंब असतात. नोकरी करत असताना अनेक अडचणीही येतात. आपली जिथे बदली होतेय तेथील लोकांची मानसिकता, तिथल्या पद्धती याच्याशी जुळवा जुळव करून घ्यावी लागते. अनेक अडथळ्यांनंतर घडलेली आपल्या प्रियजनांची भेट  सगळा शीण दूर करते यातच सारं काही आलं. मी ज्या गोष्टी मुंबईत शिकले त्या इथल्या लोकांना देण्याचा प्रयत्न करतेय.

सुजाता पाटील, डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस

शिकण्याची प्रक्रिया सुरूच

sayali-palandeमाझे काम ही माझी पॅशन आहे. मुळात मी एक संशोधक असल्याने एका विशिष्ट गोष्टीच्या संशोधनातून मला माझे अस्तित्व, ओळख निर्माण करायची आहे. ज्या गोष्टी लोकांना कळत नाही. त्याबाबत आपण अभ्यास करून स्वतःचे म्हणणे मांडू शकतो यात आनंद असतो. माझं हे शिकणं कायम सुरूच राहणार आहे. माझे म्हणणे मला लोकांसमोर मांडता येते, शिकता येते आणि माझा खर्च करता येतो यातच आनंद आहे. इतिहास संशोधन ही काही माझी आवड नाही. कारण आवड ही काही काळाने थांबते. ते माझे करीयर आहे. एखाद्या क्षेत्रात तुम्ही महत्त्वाचे योगदान देऊ शकता त्यासाठी तुम्ही सातत्याने काम करणे गरजेचे आहे आणि तेच मी करतेय. या कामातून अर्थाजन होते, पण समाधानही मिळते. आज मी मुक्तपणे काम करतेय ती मला माझ्या कुटुंबाचीही तितकीच साथ असल्याने… अशा प्रकारची कामे करताना आपलं कुटुंब समजूतदार असणे आवश्यक असते आणि मला तसेच कुटुंब मिळाले आहे. मी आणि माझे मिस्टर असे आम्ही दोघे असते. तेही परदेशात जात असतात त्यांचीही फिरती असते. पण आमच्यासाठी आम्ही सोयीचा वेळ निवडत असतो. पण आमच्या कामाचे नियोजन चांगले आहे. त्यामुळे काही समस्या येत नाहीत.

साईली पलांडे-दातार, इतिहास संशोधक

सगळ्या गोष्टींची तयारी हवी!

pranमी क्रुझवर रेस्टॉरेण्ट हॉस्टेस म्हणून कामाला आहे. मुक्तपणे जगण्याची आवड पहिल्यापासूनच होती. चारही बाजूला निळाशार समुद्र, पाण्याच्या लाटा आणि मी असे बऱ्याचदा वाटायचे आणि अशाच क्षेत्रात आपण काम करायचे असे ठरवले होते. त्यासाठी मी क्रुझवरची माहिती काढली, कोर्स केला. सहा-सहा महिने कुटुंबापासून दूर असते. अनेकदा घरापासून दूर असल्याचा त्रासही व्हायचा. पण आयुष्यात स्वावलंबी व्हायचे, काहीतरी करून दाखवायचे असे ठरवलेच होते. जेव्हा मी पहिल्यांदा क्रुझवर गेले तेव्हा ते जग फार वेगळे वाटले. तिथली वेगवेगळी परदेशी लोकं, तिथली संस्कृती यांच्याशी जुळवाजुळव करताना वेळ गेला, पण करीअर करायचे असेल तर सगळ्या परिस्थितीत आपल्याला जुळवून घेता आले पाहिजे असेच ठरवले होते. पण एकदा तिथली जीवनपद्धती कळली की काही अडथळा येत नाही. मी त्या परिस्तिथीशी जुळवून घेतले, कारण त्यावेळी फक्त करीअर डोक्यात होते. पण  कुटुंबाची आठवण येतच असते. अनेकदा तिथल्या गर्दीत मैत्री अनेकांशी होते पण आपली आपुलकीची माणसं जवळ नसतात. त्यांची कमी कोणीच भरून काढू शकत नाही. पण आज सोशल साईटस्मुळे व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून कुटुंबाच्या जवळ राहता येते. पण अनेकदा नेटवर्कचा अडथळा निर्माण होतो आणि वाट बघण्यापलीकडे काहीच पर्याय नसतो. पण आता नवराही क्रुझवर असल्याने आता फारशा समस्या येत नाहीत.  दोघेही समजूतदार आहोत. दोघानांही एकमेकांच्या कामाची कल्पना आहे. त्यामुळे त्याचा आम्हाला फायदाच झाला. पण बाकीचे कुटुंब मुंबईत असल्याने त्यांना खूप मिस करते. सध्या मी सुट्टीवर असल्याने सुट्टीचा आनंद घेतेय. कुटुंबापासून दूर राहावे लागते यामुळे अनेक जण अशाप्रकारच्या नोकऱ्या करत नाहीत किंवा अर्धवट सोडल्या जातात. पण आपलं करीअर आपल्याला करायचे असेल तर या सगळ्या गोष्टींची तयारी ठेवायला हवी.

प्रगती मोरे, रेस्टॉरेण्ट हॉस्टेस क्रुझ

आवडीचा जोडीदार, घर, संसार, मुलं सगळं….अगदी सग्गळं हवं आणि उच्चशिक्षण…करिअर… स्वप्न…याचं काय…ही स्वप्नं बऱ्याचदा दुसऱ्या गावी, बाहेरच्या देशात पूर्ण होतात…किंवा करावी लागतात किंवा त्यावर पाणी सोडावं लागतं. पण आपण स्त्रीया हार मानणाऱ्या नाहीच मुळी. ही तारेवरची कसरत हसत हसत पार पाडतो.

संजीवनी धुरी-जाधव

आपली प्रतिक्रिया द्या