परीक्षा केंद्रात पोहचण्यास उशीर झाल्याने शंभर परीक्षार्थी वंचित

45

सामना प्रतिनिधी । हिंगोली

महाराष्ट्र शिक्षण परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता चाचणी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रात पोहचण्यास उशीर झाल्याने शंभर विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले आहे. यामुळे काही संतप्त विद्यार्थ्यांनी हिंगोली-कळमनुरी रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले.

रविवारी हिंगोलीच्या ७ परीक्षा केंद्रावर शिक्षक पात्रता चाचणी परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेला २ हजार १६७ पैकी १ हजार ८८१ परीक्षार्थी उपस्थित होते. तर २८६ जण गैरहजर होते. दरम्यान, केंद्रावर पोहचण्यास ५ ते १० मिनिटांचा उशीर झाला म्हणुन परीक्षेला बसु दिले नसल्याचा आरोप करत शंभर परीक्षार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली.

जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातुन रविवारी टीईटी अर्थात शिक्षक पात्रता चाचणी परीक्षा घेण्यात आली. जिल्हाधिकारी अनिल भंडारी व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ह.पी. तुम्मोड यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे आयोजन करण्यात आले. शहरातील सरजुदेवी कन्या विद्यालय, माणिक स्मारक विद्यालय, आदर्श महाविद्यालयात ४ केंद्रावर सकाळच्या सत्रात तर सेक्रेट हार्ट शाळा व आदर्श महाविद्यालयाच्या एकुण ३ केंद्रावर दुपारच्या सत्रामध्ये परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या २ हजार १६७ उमेदवारांपैकी दोन्ही सत्रात मिळुन १ हजार ८८१ परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली. तसेच २८६ उमेदवार अनुपस्थित होते. अशी माहिती शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी दिली आहे.

दरम्यान, सरजुदेवी विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर ५ ते १० मिनिट उशीर झाला म्हणुन आम्हाला परीक्षेलाच बसु दिले नाही असा आरोप शंभरहुन अधिक परीक्षार्थ्यांनी केला आहे. परीक्षेपासुन वंचित राहिलेल्या या सर्व परीक्षार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठुन जिल्हा प्रशासनासमोर कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, रविवारची सुट्टी असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने भ्रमणध्वनीवरच विद्यार्थ्यांनी म्हणणे मांडले. तर काही संतप्त परीक्षार्थ्यांनी कळमनुरी-हिंगोली रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच काही काळ रास्ता रोको करुन रोष व्यक्त केला. दरम्यान, परीक्षेसाठी दिलेल्या प्रवेशपत्रावर उमेदवारांसाठी नियम व अट क्रमांक ४ नुसार परीक्षा केंद्रावर सकाळी १० वाजता तर परीक्षा खोलीत १० वाजुन १० मिनिटाला पोहचण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानंतर आलेल्या परीक्षार्थ्यांना प्रवेश देऊ नये, असे आदेश असल्यामुळे केंद्र संचालकांनी उशीरा आलेल्या उमेदवारांना प्रवेश दिला नसल्याचे शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या