प्रयागराजमध्ये एका विद्यार्थ्यांने बनवली 13 रुपयात 100 किलोमीटर चालणारी बाईक

सामना ऑनलाईन । प्रयागराज

प्रयागराजमधील बारावीचा विद्यार्थी शिवम चौहान (वय 18) याने 13 रुपयात 100 किलोमीटर चालणारी बाईक बनवली आहे. या बाईकसाठी कोणत्याही इंधनाची गरज नसून ती बॅटरीवर चालणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नीतीन गडकरी यांनी या अनोख्य़ा संशोधनाबाबत शिवमचे कौतुक केले आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती, वाहनांमुळे होणारे वायूप्रदूषण यासारख्या समस्या सोडवण्यासाठी अशी वाहने चांगली उपयोगी असल्याचे त्यांनी सांगितले. शिवमने बनवलेल्या या बाईकचे मॉडेल गडकरी यांनी नागपूरमध्ये बघितले होते.

या बाईकचे उत्पादन करण्यासाठी गुरुग्राममधील इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीकडून (आईसीएटी) परवानगी आणि प्रमाणपत्रासाठी प्रयत्न करत असल्याचे शिवमने सांगितले. अनेक देश अद्ययावत बाईक बनवत आहेत. तशीच बाइक बनवण्याची इच्छा मनात होती. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे इंधनावर चालणारी बाइक बनवायची नव्हती. तसेच या वाहनामुळे प्रदूषणही टाळायचे होते. त्यामुळे बॅटरीवर चालणारी बाईक बनवण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने प्रयत्न केल्यावर ही बाईक तयार झाली आहे. इतर बाईकपेक्षा यात कोणतीही वेगळे स्पेअर पार्ट वापरलेले नाहीत असेही त्याने सांगितले. या बाईकचे वैशिष्ट्य म्हणजे ही अवघ्या 13 रुपयात 100 किलोमीटरचे अंतर कापणार आहे. तसेच एकदाच ही बाईक पूर्ण चार्ज केल्यावर 50 हजार किलोमीटरचा प्रवास करू शकणार आहे. या बाईकचा वेग 60 किलोमीटर प्रतितास असेल. तसेच बाईकच्या गतीचा परिणाम एव्हरेजवर होणार नाही.ही बाईक बनवण्यासाठी शिवमला तीन महिने लागले असून त्यासाठी पाच लाखांचा खर्च करण्यात आला आहे.