कश्मीरमध्ये विद्यार्थ्यांनी फडकवले इसिसचे झेंडे, बुरहान वाणीचे पोस्टर दाखवले

सामना ऑनलाईन । श्रीनगर
कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी इसिस या दहशतवादी संघटनेचे झेंडे फडकवले व बुरहान वाणीचे पोस्टर झळकवले. यावेळी पोस्टर हटवण्यासाठी गेलेल्या जवानांवर विद्यार्थ्यानी दगडफेक केली. यामुळे जमावाला पांगवण्यासाठी जवानांना अश्रूधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
शनिवारी श्रीनगरमधील गोजगी बाग परिसरातील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी जवानांविरोधात आंदोलन छेडले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली होती. यामुळे विद्यार्थ्यांना हटवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला होता. ज्यात काही विद्यार्थी जखमी झाले होते. या घटनेचा निषेध म्हणून आज पुलवामातील एका कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जवानांविरोधात मोर्चा काढला होता. यात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या वेळी विद्यार्थी आझादीची घोषणाबाजी करत इसिसचे झेंडे फडकवत होते, तर काहीजण दहशतवादी बुरहान वाणी याचे पोस्टर घेवून कॉलेजच्या एडमिनिस्ट्रेटिव्ह विभागाच्या गच्चीवर उभे होते. जवानांनी विद्यार्थ्यांना पोस्टर्स हटवण्यास सांगताच विद्यार्थ्यांनी आजादीची घोषणाबाजी करत जवांनांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. तासभर हा गोंधळ सुरू होता. त्यानंतर जवानांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले व विद्यार्थ्यांना तेथून हटवले.