शिक्षकांनी प्रेयसीकडून राखी बांधली, प्रियकराने कॉलेजच्या छतावरून उडी घेतली

सामना ऑनलाईन । आगरतळा

देशभरामध्ये मोठ्या उत्साहात रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. परंतु त्रिपुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका कॉलेजमध्ये शिक्षकांनी प्रेयसीच्या हातून 18 वर्षीय प्रियकराला राखी बांधण्याचा प्रयत्न केला. सर्वांसमोर झालेल्या अपमानामुळे संतप्त झालेल्या प्रियकराने कॉलेजच्या छतावरून उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तो यातून वाचला परंतु गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कुटुंबीयांनी शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, आगरतळा येथील एका खासगी काँग्रेसच्या मुख्याध्यापकांनी आणि काही शिक्षकांनी 18 वर्षीय विद्यार्थ्याला स्टाफ रूममध्ये बोलावले. त्यासोबत त्याची प्रेयसीलाही आणण्यास सांगितले. यानंतर शिक्षकांनी प्रेयसीच्या हातून 18 वर्षीय प्रियकराला राखी बांधण्यास सांगितले. विद्यार्थ्यांने यास विरोध केला. परंतु शिक्षकांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तेव्हा विद्यार्थ्यांने कॉलेजच्या छतावर जाऊन उडी घेतली. सुदैवाने विद्यार्थ्याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न फसला आणि तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच कॉलेजमध्ये खळबळ उडाली. यानंतर कॉलेज प्रशासनाने रुग्णालयात जात विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. ही घटना समजल्यानंतर विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी कॉलेज प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू केले. संतप्त कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी नरसिंहगढ-आगरतळा रोडवर चक्का जाम आंदोलन केले. कुटुंबीयांनी शिक्षकांना अटक करण्याची मागणी केली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्रिपुराचे शिक्षामंत्री रतन लाल यांनी विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.