दप्तर ओझे तपासणी कागदावरच!

सामना ऑनलाईन । मुंबई

शाळा सुरू झाल्यापासून प्रत्येक महिन्यात शिक्षणाधिकाऱयांमार्फत होणारी दप्तराच्या ओझ्याची तपासणी केवळ कागदावरच आहे. शाळा सुरू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच १४ जूनला जारी झालेल्या जीआरमध्ये प्रत्येक महिन्यात शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तर ओझे तपासणार असे म्हटले होते, पण हा जीआर जाहीर होऊन चार महिने उलटले तरी अद्याप एकदाही दप्तर तपासणी झाली नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

२०१७-१८ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या पाठीवरचा भार कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून कडक पावले उचलण्याचा निर्णय जूनमध्येच घेण्यात आला होता. जूनमध्ये नाही, निदान जुलै महिन्यापासून तरी शिक्षण विभागातील अधिकाऱयांमार्फत शाळेला भेट देऊन दप्तर ओझ्याचा आढावा घेणे अपेक्षित होते, पण आतापर्यंत शाळेचे मुख्याध्यापकच विद्यार्थ्यांचे दप्तर तपासत आहेत. हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे शिक्षक उदय नरे यांनी सांगितले, ‘‘दप्तर ओझे तपासणी ही केवळ धूळफेक असून शिक्षण विभागाकडे प्रत्येक महिन्याला तपासणी करण्यासाठी अधिकारीच उपलब्ध नाहीत. असे असतानाही जर प्रत्येक जिह्याचा तपासणी अहवाल शिक्षण संचालकांनी सादर केला तर ही गंभीर बाब म्हणावी लागेल.’’ दप्तराच्या तपासणीविषयी माहिती घेण्यासाठी पालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर आणि प्राथमिक शिक्षण संचालक सुनील मगर यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

 

१४ जूनचा जीआर काय म्हणतो…
– २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रत्येक महिन्यात प्राथमिक शिक्षणाधिकाऱयांमार्फत विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी करावी.
– प्रत्येक जिह्याच्या शिक्षणाधिकाऱयांनी तपासणी अहवाल प्राथमिक शिक्षण संचालकांकडे पाठवावा.
– राज्यातील सर्व जिह्यांचा एकत्रित अहवाल दर महिन्याच्या १५ तारखेला संचालकांनी राज्य सरकारला सादर करावा.
– विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तर ओझे कमी न झाल्यास त्यासाठी मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येणार.

 

१४ जूनला काढलेल्या जीआरप्रमाणे आतापर्यंत राज्यातील किती जिह्यांतून दप्तर ओझे तपासणीचा अहवाल आला आहे तसेच या अहवालानुसार जास्त ओझे आढळलेल्या किती शाळांच्या मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात आली आहे याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालकांकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविली आहे. ही माहिती मिळाल्यावर राज्यात दप्तर ओझे तपासणी प्रत्यक्षात सुरू आहे की नाही ते समजेल.
– स्वाती पाटील, याचिकाकर्त्या