आकाश – २०१७

93

आकाश हे उघडे पुस्तक आहे. कोणतेही इतर पुस्तक अभ्यासायचे तर ते प्रथम उघडावे लागते. तसेच त्या पुस्तकासाठी पैसे खर्च करावे लागतात, पण आकाशाचे तसे नसते, ते सदैव उघडलेलेच असते. फक्त नजर टाकावयाची आणि शिकून घ्यायचे. तसेच त्यासाठी पैसेही द्यायला लागत नाहीत.

२०१७ च्या या नवीन वर्षात आकाशात खूप गमतीच्या गोष्टी घडणार आहेत. आज या लेखात आपण त्यांची माहिती करून घेऊया. आकाशातील नक्षत्रे ओळखणे तसे सोपे आहे. फक्त आपण चांद्र महिन्यांची आणि नक्षत्रांची नावे पाठ करायची आणि त्यावरून रात्री कोणते नक्षत्र दिसेल ते सहज ओळखायचं. चैत्र महिन्यात चित्रा नक्षत्र रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला उगवून रात्रभर आकाशात दर्शन देऊन पहाटे पश्चिमेला मावळते. तसेच चैत्र पौर्णिमेला चंद्र चित्रा नक्षत्रापाशी असतो. वैशाख महिन्यात विशाखा, ज्येष्ठ महिन्यात ज्येष्ठा, आषाढात पूर्वाषाढा, श्रावणात श्रवण, भाद्रपदात पूर्वाभाद्रपदा, आश्विनात अश्विनी,,कार्तिकात कृत्तिका, मार्गशीर्षात मृग, पुष्य , माघात मघा, फाल्गुनात उत्तराफाल्गुनी नक्षत्रांचे दर्शन होते.

नवीन धूमकेतू

या नूतन वर्षाच्या प्रारंभी एक नवीन धूमकेतू दुर्बिणीतून आपणांस दिसणार आहे. नासाच्या निओवाईज प्रोजेक्टने हा नवीन धूमकेतू २१ ऑक्टोबर २०१६ रोजी प्रथम शोधला. या धूमकेतूचे नाव `सी / २०१६ युवन निओवाईज’ असे ठेवण्यात आले आहे. या दुर्मिळ धूमकेतूचे दर्शन या आठवडय़ात सूर्योदयापूर्वी आग्नेय दिशेला दुर्बिणीतून होणार आहे. हा धूमकेतू १४ जानेवारी २०१७ ला मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यापाशी जाणार आहे. १३ डिसेंबर २०१६ रोजी तो पृथ्वीच्या जवळ आला होता. त्यावेळी तो पृथ्वीपासून १० कोटी ६० लक्ष किलोमीटर अंतरावर होता. हा धूमकेतू फक्त दुर्बिणीतूनच दिसणार आहे.
धूमकेतू म्हणजे धूलिकण, बर्फ आणि वायू यांचा गोळा असतो. हे धूमकेतू जेव्हा मंगळ कक्षा ओलांडतात तेव्हा त्यांना पिसारा फुटतो. तुमच्यापैकी अनेक जणांनी इकियासेकी, बेनेट, वेस्ट, हॅले, हेलबॉप, ह्याकुताके हे धूमकेतू साध्या डोळ्यांनी पूर्वी पाहिले असतील. जो धूमकेतू प्रथम शोधतो, त्याचे नाव धूमकेतूला देण्यात येते. एखाद्या धूमकेतूमधून पृथ्वी गेली असल्याने पृथ्वीवर पाणी निर्माण झाल्याची शक्यता सांगितली जाते. एखाद्या दुसऱ्या धूमकेतूमधून पृथ्वी गेली असेल त्यावेळी अमायनो आम्ले पृथ्वीवर शिंपडली गेल्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली असावी असेही सांगितले जाते. १४ ऑगस्ट २१२० रोजी `स्वीफ्ट टटल ‘हा धूमकेतू पृथ्वीवर आदळण्याची शक्यताही वर्तविली गेली होती.

या नूतन वर्षात एकूण चार ग्रहणे होणार आहेत. १० फेब्रुवारीचे छायाकल्प चंद्रग्रहण हिंदुस्थानातून दिसणार आहे. तसेच ७ ऑगस्ट चे खंडग्रास चंद्रग्रहणही हिंदुस्थानातून दिसणार आहे. २६ फेब्रुवारीचे कंकणाकृती सूर्यग्रहण आणि २१ ऑगस्टचे खग्रास सूर्यग्रहण हिंदुस्थानातून दिसणार नाही.

नूतन वर्षात २२ मार्च ते २६ मार्च शुक्र सूर्यतेजामध्ये लुप्त असल्याने दिसणार नाही. तसेच १६ डिसेंबरपासून १ फेब्रुवारी २०१८ पर्यंत शुक्र सूर्यतेजामध्ये लुप्त असणार आहे. गुरू ग्रह १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर पर्यंत सूर्यतेजामध्ये लुप्त असल्याने दिसणार नाही. या नूतन वर्षात ८ एप्रिल रोजी गुरू ग्रह पृथ्वीच्या जवळ येणार आहे. तसेच १५ जून रोजी शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ येणार आहे. या नूतन वर्षी मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ येणार नाही. या नूतन वर्षी ५ ऑक्टोबर रोजी शुक्र मंगळ, १३ नोव्हेंबर रोजी गुरू शुक्र, २५ डिसेंबर रोजी शुक्र-शनी यांची युती दिसणार आहे. या नूतन वर्षी ३-४ डिसेंबर, २१-२२ एप्रिल, ५-६ मे, २७-२८ जुलै, ११-१२ ऑगस्ट , २१-२२ ऑक्टोबर, १७-१८ नोव्हेंबर आणि १३-१४ डिसेंबर रोजी उल्कावर्षाव दिसणार आहेत.

दा.कृ.सोमण

आपली प्रतिक्रिया द्या