मातृभाषेत शिकणं सोपं असतं!

संजय मिस्त्री, संभाजीनगर

संभाजीनगरातील डॉ. वसंत आचवल यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील पायाभूत ठरणारे ‘स्ट्रेन्थ ऑफ मटेरियल’ हे पुस्तक ‘पदार्थ बल’ या नावाने मराठीतून लिहून प्रसिद्ध केले. या अभिनव प्रयोगाचा प्राध्यापकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकाला चांगलाच उपयोग होईल.

उच्च शिक्षण हे फक्त इंग्रजीतूनच असते. त्यामुळे मराठी मातृभाषा असलेल्या जवळपास सर्वच मुलांना जेव्हा उच्च शिक्षण घ्यायची वेळ येते, तेव्हा इंग्रजीच्या नावाने अंगावर काटाच येतो. पुढे सरावाने इंग्रजी कशीबशी रुळते, पण असे उच्च शिक्षण केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्यापुरते ठरते! अशी मुले आयुष्यात खरी प्रगती साधू शकत नाहीत. उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची ही अवस्था पाहून संभाजीनगरातील डॉ. वसंत आचवल यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील पायाभूत ठरणारे ‘स्ट्रेन्थ ऑफ मटेरियल’ हे पुस्तक ‘पदार्थ बल’ या नावाने मराठीतून लिहून प्रसिद्ध केले. या अभिनव प्रयोगाचा प्राध्यापकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकाला चांगलाच उपयोग होईल. एवढेच नव्हे तर अभियांत्रिकीतील या विषयाचा निकालही उंचावेल, असे मानले जात आहे! मातृभाषेतून उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱया डॉ. वसंत आचवल यांच्याशी केलेली ही बातचित!

या विषयावर मराठीतून पुस्तक लिहावे असे का वाटले?

अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे मराठी मातृभाषा असलेले, इंग्रजीचा न्यूनगंड असलेले आणि ग्रामीण भागातून आलेले असतात. अभियांत्रिकीला प्रवेश घेतल्यानंतर त्यांना इंग्रजी भाषेतून शिकवले जाते. तेव्हा त्यांच्या लक्षात येते की, आपल्याला हा विषय इंग्रजीतून समजतच नाही. अशाच काही विद्यार्थ्यांनी मागणी केली की, सर, मराठीतून समजावून सांगा. त्यानुसार जो पाठ शिकवायचा, त्याचे मराठीतून मुद्दे काढले आणि मराठीतून शिकवणे सुरू केले. दरम्यान या विषयातील प्राध्यापक आणि बीई सिव्हिल शिकलेले विद्यार्थीसुध्दा या विषयाचे मराठीत काढलेले मुद्दे मागू लागले. तेव्हा असे लक्षात आले की, शिकून उत्तीर्ण झालेल्यांनाही विषयाचे खरे आकलन होऊ शकलेले नाही. त्यातून मग या विषयावर मराठीतून पुस्तक असण्याची आवश्यकता वाटू लागली. कुणीतरी या विषयावर पुस्तक लिहिण्यापेक्षा मीच का लिहू नये, असा विचार करून आपण या विषयावर पुस्तक लिहून काढले.

अभ्यासक्रमच इंग्रजी असेल तर मराठीतून शिकवणे योग्य ठरते का?

’स्ट्रेन्थ ऑफ मटेरियल्स’ हा स्थापत्य अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा पायाभूत विषय आहे जेव्हा मी मातृभाषेतून मी हा विषय समजावून सांगू लागलो, तेव्हा त्याचे निश्चितच फायदे होतात, असे सर्वांच्याच लक्षात येऊ लागले. ज्या संस्थेत मी शिकवत होतो, त्या संस्थेच्या विश्वस्तांनी मला इंग्रजीतूनच शिकवण्याचा आग्रह धरला होता खरा, प्रत्यक्षात जेव्हा विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकीचा पायाच मजबूत होतोय, त्यांचे विषयाचे आकलन चांगल्या रितीने वाढतेय, परिणामी निकालही उंचावतोय, असेच दिसून येऊ लागले. परिणामी उच्च शिक्षणही मातृभाषेतून व्हायला हवे, यावर एक प्रकारे शिक्कामोर्तबच होऊ लागले आणि ‘पदार्थ बल’ या नावाने मी हे मराठीतून पुस्तक तयार केले.

इंग्रजी ही जागतिक भाषा आहे आणि स्पर्धेत कमी पडायला नको म्हणून इंग्रजीतून शिकणे अधिक चांगले नाही का?

आपला स्वतःचा आणि देशाचा विकास करणे, हे आपले मूळ ध्येय आहे. ते साध्य होईल मातृभाषेतून शिक्षण मिळाल्यानेच. जगभरातील ज्या देशांनी आज विकासात, प्रगतीत आघाडी घेतलेली आहे ते प्रत्येक राष्ट्र आज उच्च शिक्षण मातृभाषेतूनच देत आहेत. चीन या देशाने तर एक वर्ष देशातील सर्व विद्यापीठे बंद ठेवून उच्च शिक्षणातील सर्व अभ्यासक्रम मातृभाषेतून तयार करुन घेऊन मग पुन्हा शिकवणे सुरु केले, आज चीन कुठे पोहोचला, हे आपण पाहतो आहेच.  मातृभाषेतून शिकल्याने विद्यार्थ्यांना चांगले समजते, त्यांची विचारप्रवृत्ती वाढते, तसेही आपल्याकडे इंग्रजी ही केवळ परीक्षेपुरतीच शिकली जाते. इंग्रजीतून शिकवल्याने आपल्या मुलांची त्या त्या विषयातील विचारक्षमता वाढतेच असे नाही. इंग्रजी संपर्कभाषा म्हणून शिकलीच पाहिजे. त्यात पारंगतही झाले पाहिजे. पण फक्त इंग्रजीतून अभ्यासक्रमच शिकवला गेला पाहिजे, हा अट्टहास कशासाठी?

मातृभाषेत लिहीलेले हे पुस्तक विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरावे, यासाठी काय विशेष प्रयत्न करावे लागले?

एक मुद्दा आधी स्पष्ट करतो. विद्यार्थ्यांना समजावे, विषयाचे आकलन व्हावे यासाठी हे पुस्तक आहे. परंतु, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षा मात्र इंग्रजीतूनच द्यायची आहे, हे लक्षात घेऊन हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. त्यामुळे यातील संज्ञा, परिभाषिक शब्द हे मूळ इंग्रजीतील जसेच्या तसे ठेवण्यात आले आहेत. सूत्रांची मांडणी इंग्रजीच ठेवली. त्याचे मराठीकरण करणे फार क्लिष्ट आणि अनावश्यक होते. पण त्याचे विश्लेषण किंवा विस्तार मराठीत आहे. या पुस्तकाचे वैशिष्टय़ हे आहे की, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची इंग्रजीत खूप पुस्तके उपलब्ध असली, तरी बहुतांश पुस्तकांमध्ये विषयाच्या मूलभूत संकल्पनांचे विश्लेषण केलेले दिसून येत नाही. जोपर्यंत मूळ संकल्पना कळत नाही, तोपर्यंत विषयाची स्पष्टताच येणार नाही, हे लक्षात घेऊन मूळ संकल्पना मराठीतून स्पष्ट केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काळजी घेऊन लिहीलेले हे मराठीतील पुस्तक एकप्रकारे इंग्रजीपेक्षा सरस ठरते.

यापुढेही अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीतून लिहिण्याचा मानस आहे?

एकूणच सर्व शिक्षण, विशेषतः उच्च शिक्षण मातृभाषेतून असावे, अशी माझी तीक्र इच्छा आहे. माझ्याकडून मी काम सुरू केलेले आहे. प्रोगेसिव्ह एक्सपर्ट कन्सल्टिगचे परिमल मराठे यांची मला मोलाची साथ मिळाली. खारीचा वाटा या न्यायाने हे काम पुढे नेण्याचा माझा मानस आहे. स्थापत्य अभियांत्रिकीच्या दुसऱया वर्षाच्या अभ्यासक्रमाचे हे पुस्तक लिहून झाल्यानंतर आता याच अभ्यासक्रमाची पुढील वर्षाला लागणारी थेअरी ऑफ स्ट्रक्चर भाग 1 व भाग 2 तसेच स्ट्रक्चरल मेकॅनिक्स ही अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीतून लिहिणार आहे.