स्टंटबाजी करणारा रिक्षाचालक गजाआड; वांद्रे पोलिसांची कारवाई

2

सामना ऑनलाईन । मुंबई

धूमस्टाइलने मोटारसायकलवर स्टंट केले जातात, पण आता स्टंटबाजीकरिता रिक्षाचा वापर होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. ‘शब ए बारात’दरम्यान वांद्रे पोलिसांनी स्टंटबाजी करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक केली. समीम मुमताज अहमद शेख असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

वांद्रे सी लिंक परिसरात काही तरुण मोटारसायकलवर जीवघेणे स्टंट करतात. अशा स्टंटबाजांवर पोलीस कारवाई करत असतात. खासकरून शनिवारच्या रात्री स्टंटबाजीचे प्रकार होऊ नयेत म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवतात. शनिवारी ‘शब ए बारात’ असल्यामुळे स्टंटबाजीचे प्रकार होऊ नयेत म्हणून वांद्रे पोलिसांनी चार ठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. वरिष्ठ निरीक्षक गिरीश अणावकर, पोलीस निरीक्षक भूषण बेळणेकर, घोरपडे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी पहाटेपर्यंत बंदोबस्ताला होते. रात्री अडीच वाजताच्या सुमारास वांद्रे पोलिसांनी खेरवाडी जंक्शनजवळ बंदोबस्त ठेवला होता तेव्हा समीम हा नागमोडी वळणे घेत एका टायरवर रिक्षा चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला थांबण्यास सांगितले तेव्हा समीम पळून जाऊ लागला. पोलिसांनी अखेर त्याला पकडले. त्याच्या विरोधात वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला अटक करून स्थानिक न्यायालयात हजर केले होते.

 चार गुन्हे आणि 11 मोटारसायकली जप्त

‘शब ए बारात’दरम्यान वांद्रे पोलिसांनी कारवाईकरिता स्थानिक 15 स्वयंसेवकांची मदत घेतली होती. पहाटे उशिरापर्यंत पोलिसांनी सुसाट वेगात मोटारसायकल चालवल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल करून 13 जणांवर कारवाई केली. कारवाई करून 11 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.