स्टायलीश चष्मा

वय झालं म्हणून काय झालं…? स्टायलीश दिसण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. अगदी ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा! पण या वयात डोळ्यांच्या समस्या जरा जास्त सतावतात. त्यामुळे चष्मा स्टायलीश असण्यापेक्षा ज्येष्ठांचं लक्ष त्यातून छान वाचता यायला हवं याकडे असतं. पण त्यातूनही आजचे काही ज्येष्ठ नागरिक चष्मा स्टायलीश असावा यावरही भर देऊ लागले आहेत. ब-याचजणांना या वयात जास्त प्रकाश सहन होत नाही. त्याचेही निराकरण या चष्म्याद्वारे होणे गरजेचे असते.

स्टायलीश चष्मा घेण्याआधी सर्वात महत्त्वाची असते ती डोळ्यांभोवती असलेल्या त्वचेची काळजी… डोळ्यांखालील काळी वर्तुळे हसताना स्पष्ट दिसतात. ती झाकण्यासाठी तसेच तेथील त्वचा सूर्यकिरणांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी स्टायलीश चष्मा लावणे गरजेचे ठरते. अशा प्रकारचे चष्मे थोडे मोठय़ा आकाराचे असल्याने पूर्ण डोळ्यांबरोबरच भुवयादेखील झाकल्या जातात. असे चष्मे घ्यायचे तर साधारणपणे क्लासिक सोफिया लॉरेन किंवा टर्मिनेटर या ब्रॅण्डचे घ्यायचे. त्यामुळे त्वचाही सुरक्षित राहाते. कोणत्याही प्रकारच्या स्टाईलचा चष्मा घेतला तरी त्याद्वारे सूर्याच्या यूव्हीए आणि यूव्हीबी किरणांपासून शंभर टक्के बचाव होतोय की नाही हे पाहून घेतले पाहिजे.

ठराविक वयानंतर मोतीबिंदू होण्याची शक्यता वाढते. मात्र स्टायलीश चष्मा वापरत असाल तर तो धोका बहुतांशी टाळता येऊ शकतो. मोतीबिंदू टाळता येणं शक्य नसलं तरी त्याची वाढ कमी करता येते. या विकाराची सुरुवात वयाच्या चाळीशीनंतर काहीजणांमध्ये सुरू होते. मात्र सूर्याच्या यूव्ही किरणांपासून डोळ्यांचा आधीपासूनच बचाव करत असाल तर मोतीबिंदूचा विकास वेगाने होत नाही आणि मोतीबिंदू काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेवेळी झटपट चांगला परिणाम दिसून येतो.

जास्त प्रकाश असल्यास काही ज्येष्ठांचे डोके दुखू लागते. पण स्टायलीश चष्मे घातले तर ही डोकेदुखी टाळता येऊ शकते. रात्रीसुद्धा खास प्रकारचे चष्मे घालायचे. आपल्या दृष्टीमध्ये अडथळा निर्माण करणाऱया मोठय़ा फ्रेम न घेता योग्य फ्रेम निवडा. स्टायलीश चष्मे महाग असतात असा गैरसमज आहे. मात्र फॅशनेबल आणि संरक्षण देणारे चष्मेही कमी किमतीत मिळू शकतात.