उपनिरीक्षक डॉ. वाघ यांना वायरी ग्रामस्थांची क्लीन चीट

सामना ऑनलाईन । मालवण 

मोहित झाड या युवकाला गंभीर मारहाण करणाऱ्या सतीश आचरेकर याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. पर्यटन व्यवसायावरही त्याचा परीणाम होत आहे. त्याची हद्दपारी झालीच पाहिजे असे सांगत वायरी ग्रामस्थांनी मंगळवारी (१०) पुकारलेले बेमुदत उपोषण आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांचे मनाई आदेश व मालवण पोलिसांनी बजावलेल्या उपोषण स्थगितीच्या नोटीसा प्राप्त झाल्याने स्थगित केले.

दरम्यान, मंगळवारी (१०) दुपारी वायरी ग्रामस्थांनी याबाबत पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांना उपोषण स्थगित करत असल्याचे निवेदन दिले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक डॉ, सागर वाघ यांनीही ग्रामस्थांसमोर गेल्या १० दिवसातील वस्तुस्थिती स्पष्ट केली. मारहाण प्रकरणाच्या आदल्या दिवशी शनिवार (३१ डिसेंबर) सतीश आचरेकर याच्या विरोधात तक्रार देण्यास आलेल्या राजन चव्हाण याला तक्रार घेणार नाही असे म्हटलेच नसल्याचे सांगत, आपल्या सवई प्रमाणे चव्हाण याच्या खांद्यावर हात टाकत तक्रारीबाबत वस्तुस्थिती जाणुन घेतली. त्यानंतर सतीश आचरेकर यालाही पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. तर त्याच वेळी अन्य एका महिलेची तक्रार नोंद करण्याचे काम सुरु असल्याने राजन चव्हाण यांना थांबावे लागले. व काही वेळाने ते निघून गेले. या भूमिकेनंतर ग्रामस्थांचा उपनिरीक्षक वाघ यांच्या बाबत असलेला गैरसमज दूर झाला. व गेले काही दिवस डॉ वाघ यांचे निलंबन झाले पाहिजे या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या वायरी ग्रामस्थानीच उपनिरीक्षक डॉ वाघ यांना क्लीन चीट दिली.

यावेळी वायरी सरपंच सुजाता मातोंडकर, उपसरपंच ललितकुमार वराडकर, देवबाग सरपंच उल्हास तांडेल, भाजप तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, बबलू राऊत, डॉ जितेंद्र केरकर, साक्षी लुडबे, भगवान लुडबे, प्रसाद चव्हाण, प्रदीप मांजरेकर, वर्षा चव्हाण, छोटू सावजी, अवि सामंत, शाम झाड, व अन्य उपस्थित होते.

आचरेकर याचा हद्दपारीचा प्रस्ताव
सतीश आचरेकर याची हद्दपारी झालीच पाहिजे अशी मागणी वायरी ग्रामस्थांनी कायम ठेवली. यावेळी पोलीस निरीक्षक यांनी आचरेकर याच्या हद्दपारीच्या प्रस्तावाची कार्यवाई सुरु असल्याचे सांगितले. लवकरच हा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले. तर ग्रामस्थांनी बंदर निरीक्षक यानाही निवेदन दिले.