नेर येथील सभेत डॉ. भामरे यांनी घेतला काँग्रेसचा समाचार

1

सामना प्रतिनिधी, धुळे

वर्षानुवर्षे देशात, राज्यात आणि धुळे जिल्ह्यात काँग्रेसची सत्ता होती. या काळात जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्न काँग्रेस नेते सोडवू शकले नाहीत. मला 2014 मध्ये जनतेच्या आशीर्वादाने खासदार पद मिळाले. नंतर मंत्री झालो. मंत्रीपदाचा उपयोग धुळे तालुक्यातील आणि मतदार संघातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केला, मात्र काँग्रेसचे उमेदवार माझ्यावर वैयक्तिक टीका करतात तेव्हा त्यांची कीव येते. त्यांनी एकदा आरशासमोर उभे राहून आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला देत शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी काँग्रेस आणि उमेदवार कुणाल पाटील यांचा जाहीर सभेत समाचार घेतला. तालुक्यातील नेर येथे शुक्रवारी डॉ. भामरे यांची जाहीर प्रचार सभा झाली.

सभेला धुळे बाजार समितीचे सभापती सुभाष देवरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, उत्कर्ष पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख कैलास पाटील, तालुका प्रमुख मनीष जोशी, भाजपचे प्रा. अरविंद जाधव, नेरचे सरपंच शंकर खलाणे, रामकृष्ण खलाणे, संजय शर्मा, भाजप तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष राम भदाणे, भिकाजी शिंदे, निंबा धनगर, पंडित परदेशी, दिलीप शिंदे, संतोष चौधरी उपस्थित होते. डॉ. भामरे म्हणाले, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळ सोडला तर अनेक वर्ष काँग्रेसची सर्वत्र सत्ता होती. या काळात धुळे जिह्यातील सिंचनाचे प्रश्न काँग्रेस नेते सोडवू शकले नाहीत. अनेक वर्षात सुलवाडे -जामफळ योजनेसाठी काँग्रेसच्या नेत्यांनी एक रुपयासुद्धा आणला नाही. मला संधी मिळाली आणि सुलवाडे जामफळ प्रकल्प अडीच वर्ष सातत्याने पाठपुरावा करून सर्व प्रशासकीय मान्यता मिळवल्या. पंतप्रधान विशेष निधीतून काही कोटीचा निधी मंजूर करवून आणला.

धुळे आणि शिंदखेडा तालुक्यांना जो कायम दुष्काळी तालुके म्हणून कलंक लागला आहे तो कलंक पुसण्याचे काम आपण प्रामाणिकपणे करत आहोत असे ते म्हणाले. मनमाड-इंदोर रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती आणि इंडस्ट्रीयल कॉरिडोरमध्ये धुळ्याची निवड करून उद्योग उभारणीसाठी सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली.