दुबईत मराठी उद्योजकांची ऑक्टोबरमध्ये परिषद, सुभाष देसाई उपस्थित राहणार

23

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

मराठी उद्योजकांना आखाती देशांमध्ये उद्योग उभारणीची संधी आणि व्यवसाय विस्ताराकरिता मदत व्हावी याकरिता आखाती मराठी उद्योजक परिषदेच्या वतीने १२ आणि १३ ऑक्टोबर २०१८ ला मराठी उद्योजकांच्या ‘महाबीझ’ या परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या परिषदेस राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती मराठी उद्योजक परिषदेचे सीए सिध्दार्थ सिनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दुबईतील मेरिएट हॉटेल अल जद्दाफ येथे होणाऱ्या या परिषदेमध्ये महाराष्ट्रासह विविध देशांतील एक हजारापेक्षा जास्त उद्योेजक सहभागी होणार आहेत. मराठी उद्योजकांना दुबईमध्ये उद्योेग उभारणी आणि विस्तारासंदर्भात परिषदेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी म्हणजे १२ ऑक्टोबर रोजी आखाती देशातील यशस्वी उद्योजकांशी मराठी उद्योजकांची भेट आयोजित करण्यात आली आहे.

दुसऱ्या दिवशी १३ ऑक्टोबर रोजी विविध क्षेत्रातील मराठी उद्योजकांनी दुबईमध्ये उद्योग उभारणी कशी करावी, व्यवसायाच्या विस्तारासाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत, कोणत्या क्षेत्रामध्ये दुबईसह सौदी अरेबिया, ओमान, बहारीन आदी देशांमध्ये उद्योग उभारता येऊ शकतो, या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. परिषदेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उद्योजकांनी [email protected] या ई मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस उल्हास गवळी, वाळूज इंडस्ट्रीज असोसिएशनचे सचिव हर्षवर्धन जैन, दुबईचे नितीन सस्तकार यांची प्रमुख उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या