गणपती बाप्पा… इमान इला… इमान इला

सामना ऑनलाईन । वेंगुर्ले

कोकणवासीय ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होते तो क्षण अखेर आला. सकाळी बरोबर साडेअकरा वाजता आकाशात विमानाचा आवाज घोंगावू लागला. नजरेला विमान दिसू लागताच तेथे उपस्थित गावकर्‍यांनी एकच जल्लोष केला. ‘गणपती बाप्पा… मोरया’चा गजर आणि ‘इमान इला… इमान इला’चा जल्लोष झाला आणि गेल्या कित्येक वर्षांची कोकणवासीयांची विमानाची प्रतीक्षा आज संपली. सिंधुदुर्ग जिह्यात नव्याने तयार झालेल्या चिपी विमानतळावर आज ‘ट्रायल लँडिंग’साठी विमानाचे आगमन झाले तेही साक्षात गणरायाला सोबत घेऊनच. वेंगुर्ले तालुक्यातील परुळे-चिपी येथे आयआरबी कंपनीने 271 हेक्टर क्षेत्रात बांधण्यात आलेल्या या विमानतळावर ‘गणेश चतुर्थी’च्या एक दिवस आधीच विमानाच्या ‘ट्रायल लँडिंग’चा श्रीगणेशा करण्यात आला. हे विमान चेन्नईहून उड्डाण करून आले होते. चाचणीसाठी विमान उतरवण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांना आधीच कळल्यामुळे तसेच पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्गवासीयांना उपस्थित राहण्याचे केलेले आवाहन यामुळे विमानतळ परिसरात अलोट गर्दी झाली होती. यावेळी खासदार विनायक राऊत पालकमंत्री दीपक केसरकर आमदार वैभव नाईक उपस्थित होते.  

हवाई दलाच्या बँडने स्वागत

सिंधुदुर्गात उतरलेले पहिले वहिले विमान पाहण्यासाठी ग्रामस्थांनी अलोट गर्दी केली होती. कोणी टाळ्या वाजवून विमानाचे स्वागत करीत होते तर कोणी नाचून. हवाई दलाने बँड वाजवून या विमानाचे स्वागत केले.  

दोन महिन्यांत नियमित उड्डाण

विमान उड्डाणासाठी लागणार्‍या सर्व परवानग्या मिळाल्यानंतर हे विमानतळ नियमित उड्डाणासाठी खुले होईल. एक आंतरराष्ट्रीय विमान कंपनी येथे आठवडय़ातून तीन वेळा विमान उतरवणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

गणराजही विराजमान

विमानाचे पहिले उड्डाण आणि गणेशोत्सव यांच्या पार्श्वभूमीवर या विमानातून गणपती बाप्पांची मूर्तीही आणण्यात आली. या मूर्तीची विमानतळावर प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असून दीड दिवसानंतर या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.  

शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार होणार

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे कोकण विकासाचे स्वप्न होते. आज विमानाच्या आगमनाने त्यांचे हे स्वप्न खर्‍या अर्थाने साकार होणार असल्याचे सिंधुदुर्ग जिह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले. चिपी विमानतळ हे सिंधुदुर्ग विकासाचे दालन ठरेल. 12 डिसेंबरला ज्यावेळी पहिले विमान चिपी विमानतळावर लँडिंग होईल.