सुचित्रा बांदेकर रंगभूमीवर!

2

सामना ऑनलाईन । मुंबई

रंगभूमीवर काम केलेला कलाकार नाटकांपासून फार काळ दूर राहू शकत नाही. रंगभूमीपासून आपली कारकीर्द सुरू करणारे बरेचसे कलाकार चित्रपट-मालिकांमध्ये काम केल्यानंतर पुन्हा नाटकांकडे वळल्याचं आपण नेहमीच पाहात आलो आहोत. अनेक गाजलेल्या मालिका तसंच चित्रपटांमुळे लोकप्रिय झालेल्या सुचित्रा बांदेकरही पुन्हा रंगभूमीकडे वळल्या आहेत. ‘हम पांच’ या गाजलेल्या हिंदी मालिकेद्वारे छोटा पडदा गाजवल्यानंतर मोठ्या पडद्यावर ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ सारख्या मराठी चित्रपपटापासून ‘सिंघम’ या गाजलेल्या हिंदी चित्रपटातही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या सुचित्रा २० वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर दिसणार आहेत.

डॉ.विवेक बेळे लिखित तसेच चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘कुत्ते कमीने!’ या नाटकात सुचित्रा एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. जवळजवळ २० वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकानंतर त्या मालिका आणि चित्रपटांत बिझी झाल्या होत्या. ‘कुत्ते कमीने!’ च्या माध्यमातून पुन्हा नाट्यरसिकांच्या भेटीला येण्याबाबत त्या म्हणाल्या की, जरी २० वर्षांनी पुन्हा नाटकात काम करीत असले तरी नाटकापासून कधीच दूर गेले नव्हते. नाटकात काम करण्याची इच्छा मनात होतीच. मध्यंतरीच्या काळात चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय करण्यासोबतच निर्मितीच्या कामातही व्यग्र असल्याने रंगभूमीवर काम करू शकले नव्हते. पुनरागमन करण्यासाठी एका चांगल्या नाटकाच्या प्रतिक्षेत होते. ‘कुत्ते कमीने!’च्या माध्यमातून पुनरागमन करताना खूप आनंद होत आहे.

विवेक बेळेंसारख्या लेखकाच्या लेखणीतून आकाराला आलेल्या आणि चंद्रकांत कुलकर्णींसारख्या दिग्गज दिग्दर्शकाच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या नाटकाद्वारे पुन्हा नाट्यरसिकांची सेवा करण्याची संधी मिळणं ही खूप आनंदाची गोष्ट असल्याचं सुचित्रा सांगतात.‘होम मिनिस्टर’ फेम आदेश बांदेकर यांच्या होम मिनिस्टर असलेल्या सुचित्रा सध्या ‘कुत्ते कमीने!’च्या तालमीत रमल्या असून, नाट्यरसिकांना आपली भूमिका नक्कीच आवडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. जिगीषा व अष्टविनायक निर्मित हे नाटक ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात रंगभूमीवर येणार आहे.