सुचित्रा बांदेकर २० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा रंगभूमीवर

<<नमिता वारणकर >>

अभिनेत्री सुचित्रा बांदेकर २० वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर आल्या असून ‘कुत्ते कमिने’ या नाटकात त्या महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारत आहेत. निर्मितीच्या कामात व्यग्र असल्याने अभिनयापासून त्यांनी ब्रेक घेतला होता. विवेक बेळेंनी लिहिलेल्या नाटकाचं स्क्रिप्ट खूपच आवडलं. खूप सुंदर लिहिलंय त्यांनी हे नाटक म्हणून ही भूमिका स्वीकारली, असे सुचित्रा बांदेकर सांगतात. आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक पालकाला आपल्या मुलांसाठी स्वतःच्या स्वप्नांशी तडजोड करावी लागते. काही पालक त्या व्यक्त करतात, तर काही नाही. यामुळे सध्या पालक आणि किशोरवयीन मुलं यांच्यात कसा सुसंवाद साधला जातोय? यावर भाष्य करणारं विवेक बेळे लिखित ‘कुत्ते कमिने’ हे नाटक रंगभूमीवर आले आहे.

‘कुत्ते कमिने’ या नाटकाच्या नावातही गंमत आहे. विवेक बेळेंनी नाटकातून पालकांना दिलेला कानमंत्र नक्कीच बोध घेण्यासारखा आहे. मी या नाटकात एका नववीतल्या मुलाच्या आईची भूमिका साकारतेय. शाळेत जाणाऱया मुलाच्या आईची सध्याच्या स्पर्धेच्या युगात काय गडबड सुरू आहे? तिचं काय म्हणणं असतं? स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवून ती त्या मुलाच्या मागे कशी लागते? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना या नाटकातून नक्कीच मिळतील. लेखकाने पालकांवर केलेल्या ‘कमेंट’ कधी मार्मिक विनोद करतात, तर कधी त्यांना बोध घ्यायला भाग पडतात. त्यामुळे प्रत्येक पालकाने हे नाटक पाहण्यासारखे आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.

मालिका, सिनेमा, नाटक या तिन्ही माध्यमांपैकी कुठे रमता, असे विचारता त्या सांगतात की, ही तिन्ही माध्यमे वेगवेगळी आहेत. तिन्हींमध्ये काम केलंय, मात्र सध्या नाटकात रमण्याचा प्रयत्न करतेय. मालिकांमध्ये मी जास्त रमते. मालिकांत काम करायला आवडतं. नाटक आणि सिनेमा या दोन्ही माध्यमांमध्ये स्वतःसाठी खूप वेळ मिळतो. नाटक प्रत्यक्ष सादर होत असलं तरी त्याच्या तालमी होतात. त्यामुळे आपल्या भूमिकेत सुधारणा करण्यासाठी वेळ मिळतो. सिनेमाचंही तसंच असतं. हातात पटकथा मिळते, मात्र मालिकेच्या बाबतीत तसं नसतं. दिवसाला दहा-दहा सीन करावे लागतात आणि तेही तेवढय़ाच क्षमतेने आणि आत्मीयतेने. त्यामुळे कलाकाराचा तिथे कस लागतो. या नाटकात माझी मध्यवर्ती भूमिका नाही, तरीही हे नाटक मी स्वीकारले. याचं कारण या नाटकाचं उत्तम स्क्रिप्ट. ही उत्तम स्क्रिप्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे त्या नाटकाचं गमक आहे. प्रेक्षकांना हे नाटक पाहताना मज्जा येईल, असे त्या निश्चयाने सांगतात.

नाटकाच्या तालमी

पूर्वी केलेल्या नाटकाच्या तालमी आणि आता नव्या भूमिकेसाठी केलेली तालीम याविषयी त्या सांगतात, वीस वर्षांपूर्वी मिलिंद गाडगीळ यांनी लिहिलेलं ‘खरंच माझ्यासाठी’ हे चंद्रलेखाचं नाटक केलं होतं. त्यामध्ये माझी प्रमुख व्यक्तिरेखा होती. त्या नाटकचे निर्माते मोहन वाघ आणि दिग्दर्शक देवेंद्र पेम हेते. तेव्हा आणि आताच्या  दोघा उत्तम दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या पद्धतीनेच आपल्याला आपली व्यक्तिरेखा साकारावी लागते, ही तालमीतली गंमत आहे. हे शिकायला मिळालं. त्यामुळे पूर्वी आणि आता मी दोन्हीतून आनंद घेतेय.