पुण्यातील शिवसेनेच्या रसवंती आंदोलनाला यश

2

सामना प्रतिनिधी । माजलगाव

बीड जिल्हातील माजलगाव तालुक्यातील तीन साखर कारखान्यांनी गाळप झालेल्या ऊसाची बीले देण्यात यावीत यासाठी पुणे येथील साखर संकुल साखर आयुक्त कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने मंगळवार पासून सुरू असलेल्या रसवंती आंदोलनाला यश आले असून दोन कारखान्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.

बीड जिल्ह्यातील जय महेश साखर कारखाना पवारवाडी, छत्रपती सहकारी साखर कारखाना सावरगाव आणि सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव या तिन्ही कारखान्यांनी गाळप झालेल्या ऊसाची बीले अदा न केल्यामुळे पुणे येथील साखर संकुल, साखर आयुक्त कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने मंगळवारी शिवसेनेचे माजलगाव तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली माजलगाव तालुक्यातील शेतकरी व शिवसैनिकांनी अनोखे असे ‘रसवंती आंदोलन’ सुरु केले. आंदोलनस्थळी उसाच्या चरकावर ऊस गाळून रस काढण्यात येत होता. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी आयुक्त कार्यालयात दोन कारखान्याचे शिष्टमंडळ आणि आंदोलनकर्ते यांच्यात साखर संचालक ज्ञानदेव मुकणे यांनी बैठक घेतली या बैठकीत तीन कारखान्यांपैकी छत्रपती सहकारी साखर कारखाना सावरगाव आणि लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव या दोन कारखाना प्रशासनाने डिसेंबर अखेरपर्यंतच्या गाळप झालेल्या ऊस बीलाची रक्कम येत्या दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल असे कळविल्यामुळे रसवंती आंदोलनाला यश आले आहे.

जय महेश साखर कारखाना प्रशासनाकडून मात्र आंदोलनकर्त्यांना काहीही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे आंदोलक व शेतकरी आंदोलनाची तिव्रता अधिक वाढविणार असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे. हा कारखाना मात्र शेतकऱ्यांची बीले देण्यास मागील वर्षांपासून सतत टाळाटाळ दिरंगाई करत आहे व सर्व नियम धाब्यावर बसवून शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्यांना ऊस बीले देण्या संदर्भात जय महेश साखर कारखान्याचे प्रशासन ठोस निर्णय घेणार नाही तोपर्यंत हे रसवंती आंदोलन सुरु राहील असे शिवसेनेचे माजलगाव तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सांगितले आहे.

या आंदोलनात रामदास ढगे, रमेश सर, दयानंद शिंदे, नामदेव सोजे, मुंजाबा जाधव, तिर्थराज पांचाळ, अनिल धुमाळ, हनुमान सरवदे, उध्दव धुमाळ, महेश खेटे, गजानन गिराम, महादेव सुरवसे, गणेश राऊत, निलेश मुळे, गणेश शिंदे, शिवाजी सावंत, जयराम राऊत, नाना बापमारे, गोविंद काळे, करण थोरात आदींसह शिवसैनिक व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.