20 ऑक्टोबर पासून गाळपाचा शुभारंभ; बीड जिल्ह्यात सात कारखाने सज्ज

प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । बीड

यंदाचा गळीत हंगाम 20 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. एकूण ऊस लागवड पाहता सहा ते सात महीने जोमाने कारखाने सुरू राहतील. बीड जिल्ह्यात सात कारखाने गाळपासाठी सज्ज झाले आहेत. काही भागात अतिरिक्त ऊस बाहेरच्या कारखान्याकडे पाठवावा लागेल. गाळपाविना ऊस शिल्लक राहण्याची शक्यता कमी आहे.

यंदाचा साखर गाळप हंगाम आव्हानात्मक असणार आहे. गत दोन वर्षे झालेल्या चांगल्या पावसामुळे ऊस क्षेत्र कमालीचे वाढले आहे. काही प्रमाणात अतिरिक्त ऊस लागवड ही झाली आहे. त्यातच यंदा दुष्काळ परिस्थिती आणि उसाला हुमणीची बाधा यामुळे आपला ऊस झटपट गाळपासाठी घेऊन जावा ही मानसिकता प्रत्येक शेतकऱ्यांची असणार आहे. 54 ते 56 हजार हेक्टर ऊस लागवड आणि डोळ्यासमोर विधानसभेच्या निवडणुका असल्याने साखर कारखानदारांना यंदा तारेवरची कसरत करावी लागणार आहे. आपल्या मतदार संघात शेतकरी नाराज होऊ नये यासाठी कारखानदारांना काळजी घ्यावी लागणार आहे. बीड जिल्ह्यात बंपर ऊस लागवड झाली असल्याने सर्वच कारखाने क्षमतेने गाळप करू शकणार आहे. अंदाजे सहा ते सात महिने कारखाने सुरू राहतील. 20 ऑक्टोबर पासून गाळपाला सरकारने परवानगी दिल्याने कारखानदाराची लगबग सुरू झाली आहे. काही कारखानाचे बॉयलर ही पेटवण्यात आले आहे. यंदा बीड जिल्ह्यात माजलगावचा सुंदरराव सोळुंके सहकारी, वैद्यनाथ सहकारी, माजलगावचा छत्रपती सहकारी, गढीचा जयभवानी सहकारी, पवारवाडीचा जय महेश, अंबाजोगाई सहकारी, येडेशवरी हे सात साखर कारखाने सज्ज झाले आहेत. कडाच्या महेश कारखान्यावरील धूळ आमदार भीमराव धिंड झटकण्याच्या मानसिकतेमध्ये असून शेवटच्या टप्प्यात आठवा कारखाना सुरू होऊ शकतो.

केजमधील विखे पाटील सहकारी आणि राजुरीचा गजानन साखर कारखाना मात्र बंदच राहणार आहे.