बीड जिल्ह्यातील साखर उतारा कमी का; शेतकरी संघर्ष समितीचा सवाल

2

सामना प्रतिनिधी । बीड

बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अडवण्याचे आणि नागवण्याचे काम साखर कारखान्याकडून होत आहे. उसाला जास्त भाव द्यावा लागू नये म्हणून बीड जिल्ह्यातील साखर कारखाने साखर उतारा मुद्दाम कमी दाखवतात. उसाचे बेण तेच ,पाणी तेच, जमीन तीच मग इतर कारखाने आणि बीड जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये साखर उताऱ्याची एवढी तफावत का असा सवाल शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभीषण थावरे यांनी उपस्थित केला आहे.

मराठवाड्यातील एकूण 21 साखर कारखाने यंदा गाळप करत आहेत. लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यातील साखर कारखान्याचा साखर उतारा सरासरी समाधानकारक असताना बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये मात्र साखर उतारा दरवर्षीच कमी येतो. यंदा पाऊस कमी आहे. उसाला रस कमी असल्याचे सांगत साखर जास्त असतानाही रिकव्हरी मात्र सरासरी 9 ते 10 च्या आसपास येते. इतर जिल्ह्यात आणि बीड जिल्ह्यात एवढा फरक कशाचा आहे, पाणी एकच ,उसाचे बेणे, जमीनही सारखी मग बीड जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये उतारा कमी येण्याचे गौडबंगाल काय असा सवाल उपस्थित करून बीड जिल्ह्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांना लुटण्याचे काम करत आहेत असा आरोप थावरे यांनी केला आहे.