प्रदर्शन बरवे यांचे आणि गाजावाजा भलत्याच गोष्टींचा, पालेकरांची जागा चुकली!

15


सामना प्रतिनिधी, मुंबई

चित्रकार प्रभाकर बरवे यांच्या मृत्यूनंतर तब्बल 24 वर्षांनी ‘इन साईड द एमटी बॉक्स’ प्रदर्शनाच्या उद्घाटनाला भलत्याच गोष्टींचा गाजावाजा झाला. नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट (एनजीएमए) च्या धोरणांसदर्भात अमोल पालेकर यांनी व्यक्त केलेला असंतोष योग्य होता. यासंदर्भात आम्हीदेखील संबंधितांना लेखी किंवा तोंडी कळवलेले आहे. मात्र पालेकर यांनी भावना व्यक्त करण्यासाठी निवडलेली जागा चुकीची होती. प्रदर्शनापेक्षा इतर मुद्दय़ांवर लक्ष केंद्रित होऊ नये याच भावनेतून मी जे योग्य वाटले ते केले, असे मत एनजीएमए, मुंबईच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष सुहास बहुळकर यांनी व्यक्त केले.

बरवे यांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे अमोल पालेकर यांचे भाषण आयोजकांनी थांबवले. त्या वेळी सुहास बहुळकर हे उपस्थित होते. त्यांनीही पालेकरांना फक्त बरवे यांच्यावर बोला, असा सल्ला दिला. यानंतर उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमी बहुळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. एनजीएमएसंदर्भात दिल्लीहून घेतले गेलेले निर्णय योग्य नाहीत असे माझेही मत आहे व ते मी अमोल पालेकरांनी सांगण्यापूर्वी स्पष्टपणे अनेकांना सांगितले होते. स्वत: एनजीएमए मुंबईच्या सचिव, डायरेक्टर जनरल आणि डायरेक्टर यांनाही स्पष्ट शब्दांत सुनावले होते.

पालेकर यांनी जे केले त्यामुळे बरवे व त्यांचे प्रदर्शन केंद्रस्थानी न राहता वेगळाच विषय महत्त्वाचा ठरला, असे बहुळकर म्हणाले. आमच्या समितीने ज्या कलावंतांना 2019 डिसेंबरपर्यंत त्यांचे प्रदर्शन करण्यासाठी पूर्ण गॅलरी दिली होती व सरकारच्या निर्णयामुळे रद्द झाली त्यांना मी स्वतः याबाबत एकत्र येऊन काहीतरी करावे असे आग्रहपूर्वक सांगितले होते. अमोल पालेकर यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्यासाठी असे व्यासपीठ योग्य ठरले असते, असेही बहुळकरांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या