मंत्रालयात पाचव्या मजल्यावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या

सामना ऑनलाईन । मुंबई

धर्मा पाटील आत्महत्येचं प्रकरण गाजत असतानाच आज एका हर्षल रावते (४४) नावाच्या चेंबूरमध्ये राहणाऱ्या तरुणाने मंत्रालयाच्या इमारतीवरून त्रिमूर्तीं प्रारंगणात उडी घेत आत्महत्या केली आहे. पाचव्या मजल्यावरून पडल्याने हा तरुण गंभीररित्या जखमी झाला होता. पोलिसांनी उपचारासाठी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

व्हिडीओ : मंत्रालयात तरुणाचा संशयास्पद मृत्यू

आपल्या मेहुणीच्या खून प्रकरणी अटकेत असलेला हर्षल रावते जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. तसेच हा तरुण नुकताच पैठणच्या तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला होता, अशी माहिती पुढे येत आहे. गुरुवारी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागात हर्षल कामासाठी आला होता. हर्षलच्या खिशामध्ये एक चिठ्ठीही सापडली असून, त्यामध्ये ‘माय न्यायाधीश’ अशा नावाने अर्ज लिहिल्याचेही समोर आले आहे. तुरुंगातील चांगल्या वर्तनामुळे शिक्षा कमी व्हावी यासाठी हर्षलने अर्ज केला होता. मात्र तो अर्ज मान्य होत नसल्याने त्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे आपल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.

दरम्यान, शिवसेनेचे जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतारे यांनी रुग्णालयात भेट दिली आहे. तसेच राष्ट्रवादीचे अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनीही रुग्णालयात भेट दिली.

याआधी धुळ्याचे धर्मा पाटील या ८४ वर्षीय शेतकऱ्यांनं मंत्रालयातच विष घेऊन आपली जीवनयात्रा संपविली होती. बुधवारी नगर जिल्ह्यातील उच्च शिक्षित अविनाश शेटे (२५) या तरुणानं मंत्रालयासमोर पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे हा प्रसंग टळला होता. अविनाश याने सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती. मात्र सरकारने निर्णय न दिल्याने वारंवार मंत्रालयात येत होता. न्याय न मिळाल्याने हे टोकाचे पाऊल उचलले होते.