मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न

सामना प्रतिनिधी । नांदेड

हदगांव तालुक्यातील पाथरड येथील प्रकाश पंजाबराव पवार (३८) यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आपल्या राहत्या घरी काल ९ ऑगस्ट रोजी रात्री विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आज त्याला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे एकच खळबळ उडाली.

हदगांव तालुक्यातील पाथरड या ठिकाणी वास्तव्यास असलेले अल्पभूधारक शेतकरी प्रकाश पंजाबराव पवार हे गुरूवारी महाराष्ट्र बंद दरम्यान दिवसभर सकल मराठा समाजा बरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी फिरत होते. तेंव्हा सायंकाळी आपल्या घरी गेल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळेल न मिळेल या चिंतेत प्रकाश पंजाबराव पवार यांनी विषारी किटकनाशक पिवून रात्री दि ९ ऑगस्ट रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रकाश पवार यांना आज नांदेड़ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचे निवेदन ९ ऑगस्ट रोजी त्यांनी दिले होते. परंतु हदगांवचे तहसीलदार यांनी प्रकाश पवार यांना आत्महत्या करण्यापासून का रोखले नाही हा प्रश्न उपस्थित झाला असून, या ठिकाणी सकल मराठा समाजच्या वतीने राज्य सरकारवर रोष व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान प्रकाश पवार यांचे भाऊ सुशील पवार यांनी तहसीलदार यांना निवेदन देवून प्रकाश पंजाबराव पवार यांनी मराठा आरक्षण का मिळत नाही या  नैराश्यातून विष प्राशन केले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, सदरील प्रकरणाची शासनाने गांभिर्याने दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.