माय-लेकांची एकाच दोरीच्या सहाय्याने आत्महत्या

सामना प्रतिनिधी । नागपूर

शेतकरी राज्यात कठीण परिस्थितीत पोळा सण साजरा करण्याच्या तयारीत असताना बैल पोळ्याच्या पूर्वसंध्येला अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड (रेल्वे) येथे माय-लेकाने एकाच दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केल्याची ह्रदय हेलावून टाकणारी घटना घडली. मन सुन्न करुन टाकणाऱ्या या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

चांदूर रेल्वे स्थानकापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या मालखेड (रेल्वे) येथील रुपेश बाळकृष्ण फुसे (३२) हा युवक मुंबई येथे विद्युत मंडळात कार्यरत आहे. रुपेशचे आजोबा चंपतराव फुसे यांचे नुकतेच निधन झाल्यामुळे तो मुंबईवरून मालखेडला आला होता. परंतु, शनिवारी रुपेश फुसे आणि त्याची आई शशिकला बाळकृष्ण फुसे (वय ७०) यांनी एकाच दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली.

रुपेशच्या चुलत भावाचा मुलगा रुपेशच्या घरी आला असता, त्यांना दोघांचेही मृहदेह लटकलेले दिसले. या घटनेची माहिती ज्ञानेश्वर फुसे यांनी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याला दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस, मालखेड रेल्वेचे पोलीस पाटील मेघा मावरे पोहोचले होते. घटनेची माहिती पसरताच नागरीकांनी घनास्थळावर एकच गर्दी केली होती. पोलिसांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरता पाठवला आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.