इंदेश्वरी संस्थानात रामानंद महाराजांची जाळून घेवून आत्महत्या

2
bike-fire-pic

सामना प्रतिनिधी । शिरूर

शिरूर तालुक्यातील जायभाये पिंपळनेर येथील इंदेश्वरी संस्थानात असलेल्या एका पन्नास वर्षीय महाराजाने शुक्रवारी दुपारी स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतले. यात ते गंभीररित्या भाजल्याने त्यांना उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रात्री साडेदहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. सदरील महाराजांनी कुठल्या कारणावरून आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात दुपारपर्यंत कुठलीही नोंद झालेली नव्हती.

रामदास ज्ञानदेव ढाकणे हे गेल्या अनेक वर्षापासून शिरूर तालुक्यातील जायभाये पिंपळनेर येथे असलेल्या इंदेश्वरी संस्थानमध्ये आहेत. ढाकणे यांनी संस्थानात आल्यानंतर आपले नाव रामानंद सरस्वती महाराज असे बदलले. त्या ठिकाणी ते सांप्रदायाचे काम करत होते. शुक्रवारी दुपारच्या दरम्यान संस्थानामध्ये कुणीही नव्हते. तेथील एका गाडीतील डिझेल काढून ते आपल्या अंगावर ओतून घेत जाळून घेतले. काही वेळानंतर संस्थानातील इतर भक्तगण आल्यानंतर त्यांना सदरील हा प्रकार निदर्शनास आला. रामानंद महाराजांना उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सकाळी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांनी कुठल्या कारणावरून आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही. या प्रकरणी शिरूर पोलिसात दुपारपर्यंत कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.