४९ गावे करणार सामूहिक आत्महत्या

सामना प्रतिनिधी । नाशिक

चाळीस ते पंच्याऐंशी लाख रुपये प्रतिहेक्टरी दर जाहीर करून सरकारने समृद्धीविरोधी लढ्य़ात फूट पाडण्याचा डाव रचल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या महामार्गासाठी एक इंचही जमीन न देण्याचा निर्धार करीत ४९ गावांतील शेतकऱ्यांनी सरकारी दरपत्रकाची होळी केली, गावागावात बांधा-बांधांवर झाडांना दोरखंडाचे फास लटकविले, सरणही रचले आहे. बळाचा वापर करून जमिनी घेण्याचा प्रयत्न केलाच तर सामूहिक आत्महत्या करू, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. त्यांच्या या आक्रमकतेपुढे मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्याने कार्यवाही करणाऱ्या प्रशासनाची चांगलीच पळापळ झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाला जमिनी देण्यास सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यातील ४९ गावातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करीत लढाच उभारला आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या इशाऱ्याने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासह अख्खे प्रशासन कामाला लागले आहे. आठ दिवसांपूर्वी जमिनी ताब्यात घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली. जादा मोबदला देण्याचे आमीष दाखवून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्याला मुख्यमंत्र्यांनी विशेष मान्यता दिली. त्यानुसार काल शुक्रवारी, ७ जुलैला जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी घाईघाईत पत्रकार परिषद घेतली. मोजक्या गावांतील ठराविक क्षेत्राला जिरायतीसाठी ८५ लाखांचा जास्तीत जास्त, तर चाळीस लाखांचा कमीत कमी प्रतिहेक्टरी दर जाहीर केला. हंगामी बागायतीसाठी दीडपट, तर संपूर्ण बागायतीसाठी दोनपट मोबदला देण्याचे आमीष दाखविले. इतकेच नव्हे तर या योजनेला तातडीने प्रतिसाद देणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 48 तासांत आरटीजीएसने पैसे जमा करण्याची ग्वाही दिली. फळबागा, विहिरी, घरे यासाठी अडीचपट नुकसानभरपाईचाही फतवा काढला.

जमीन न देण्याचा एकमुखी निर्णय
समृद्धीविरोधी लढ्य़ात फूट पाडण्याच्या या सरकारी कुटील नीतीने प्रचंड संतापाची लाट उसळली. गावा-गावात दरपत्रकाची होळी करण्यात आली. समृद्धी महामार्गच रद्द करण्याची मागणी करण्यात आली. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ४९ गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत दरपत्रकाची होळी करीत सरकारचा निषेध केला. नाशिकमधील बैठकीत एक इंचही जमीन न देण्याचा निर्धार करण्यात आला. कुणीही थेट खरेदीने जमीन देवू नये, असा एकमुखी निर्णय घेण्यात आला. किसान सभेचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू देसले यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

प्रशासनाची पळापळ
जादा मोबदल्याचे आमिष धुडकावून शेतकरी आणखी आक्रमक झाल्याने पोलीस प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. जमिनी घेण्यासाठी शेतकऱयांत फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. बळाचा वापर करून जबरदस्ती केली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा अहवाल पोलीस यंत्रणेने प्रशासनाला दिला आहे.
शिवडे गावात ४५ ठिकाणी बांधांवर फास लटकविण्यात आले आहेत.