सुजाता पाटेकर स्थायी समितीवर

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेनेच्या नगरसेविका सुजाता पाटेकर यांची स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज सभागृहात त्याबाबत घोषणा केली. अपक्ष उमेदवार चंगेज मुलतानी यांचे नगरसेवकपद रद्द झाल्यामुळे स्थायी समितीवर शिवसेनेची एक जागा रिक्त झाली होती. या जागेवर प्रभाग क्र. ४ च्या नगरसेविका सुजाता पाटेकर यांची निवड झाली आहे.

भाजपकडून सुनीता यादव
नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे भाजपची एक जागा रिक्त झाली होती. या जागेवर भाजपच्या नगरसेविका सुनीता यादव यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आज महापौरांनी घोषित केले.

मनसेचा अपेक्षाभंग
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नगरसेवक संजय तुर्डे यांची गटनेतेपदी निवड केली असल्याचे पत्र महापौरांना दिले होते. त्याची घोषणा आज सभागृहात महापौर करतील अशी आशा मनसेच्या पदाधिकाऱ्यांना होती, मात्र ही घोषणाच न झाल्यामुळे आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा आज चांगलाच अपेक्षाभंग झाला. महापौर जोपर्यंत गटनेत्याची सभागृहात घोषणा करत नाहीत तोपर्यंत प्रथेनुसार गटनेत्याला आपले अधिकार वापरता येत नाहीत. त्यामुळे मनसेची चांगलीच कोंडी शिवसेनेने केली आहे.

तुर्डे यांना बोलूच दिले नाही
संजय तुर्डे यांनी आपल्याला बोलायचे आहे म्हणून महापौरांकडे आग्रह धरला, मात्र महापौरांनी नियमित कामकाज पुकारले आणि त्यांना बोलूच दिले नाही.