दहशत माजवाल तर याद राखा, आधी सुजयशी सामना करावा लागेल : खा. सुजय विखे

4378
sujay-vikhe patil

सामना प्रतिनिधी । नगर

मी राधाकृष्ण विखे नाही, त्यामुळे मला व माझ्या कुटुंबाला त्रास देणाऱ्यांना मी सोडणार नाही, असा इशारा नुतन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला आहे. दहशत करुन आता नगरमध्ये सामान्य नागरिकांना त्रास दिला, तर आधी सुजय विखेला सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत सुजय विखे पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. बाळासाहेब विखे पाटील यांना ज्यांनी त्रास दिला, त्या सर्वांना त्यांच्या नातवाने चोख उत्तर दिले आहे. जिल्ह्यातील कुठल्याही घड्याळामध्ये मी आता बॅटरी ठेवणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एमआयडीसीतील एका कार्यालयात झालेल्या सभेत ते बोलत होते. पालकमंत्री राम शिंदे, माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, माजी आमदार अनिल राठोड, बबनराव पाचपुते, राजेंद्र विखे, भानुदास बेरड, अभय आगरकर, शशिकांत गाडे आदी या वेळी उपस्थित होते.

पालकमंत्री शिंदे म्हणाले की, उत्तर नगर जिल्ह्याचा माणूस दक्षिणेत व दक्षिणेचा माणूस उत्तरेत निवडून आला आहे, असा नवा इतिहास आज घडला आहे. गेल्या पाच वर्षांत सरकारने केलेल्या विकासामुळे हे यश मिळाले आहे. डॉ. विखे यांची उमेदवारी शेवटपर्यंत चर्चेत होती. पण आता तुम्ही उत्तरेचे नाही, तर दक्षिणेचे खासदार आहात,’ असेही त्यांनी सांगितले.

शिवसेना उपनेते राठोड म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत देशाने दोन सर्जिकल स्ट्राईक पाहिलेत. एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणि दुसरा सुजय विखेंचा! आता केवळ ‘खासदार सुजय’ नाही तर आता ‘नामदार सुजय’ पाहिजे, असेही ते म्हणाले.

आ. विजयराव औटी म्हणाले की, राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळविणाऱ्यांपैकी डॉ. सुजय विखे आहेत. स्व. बाळासाहेबांचे स्वप्न त्यांचा नातू सुजय यांनी पूर्ण केल्याचा आनंद आहे.

राधाकृष्ण विखे म्हणाले की, नगर शहरात शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी इतिहास घडवला आहे. एक ऐतिहासिक निवडणूक आज पार पडली. आज सुजयची निवड झाली, तेव्हा बाळासाहेब विखे यांची आठवण झाली. आमच्यावर सदाशिव लोखंडे यांना निवडून आणण्याची जबाबदारी होती, तीही पूर्ण झाली, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या