निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याची सुजय विखे यांची कबुली

सामना प्रतिनिधी । नगर

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बंद खोलीमध्ये राजकीय चर्चा झाल्याची कबुली काँग्रेसचे सुजय विखे यांनी शनिवारी नगरमध्ये दिली. भाजपकडे सक्षम उमेदवार असताना ते माझ्या उमेदवारीचा विचार कसा करू शकतील, असा सवालही त्यांनी केला. माझ्या वडिलांना मी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता आपण निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.नगर शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विखे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांनी मला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची माहिती विचारली. वास्तविक पाहता, माझ्यापेक्षा त्यांना जिल्ह्याची जास्त माहिती असेलच, याबद्दल दुमत नाही. मुख्यमंत्र्यांशी बंद खोलीमध्ये चर्चा झाल्याची कबुलीही त्यांनी दिली. यावेळी राजकीय विषयावरही चर्चा झाली. पण ती जाहीर करणे योग्य नाही असे सांगून भाजपकडे सक्षम उमेदवार आहेत. तीन वेळा निवडून आलेला आहे, तेच आव्हान माझ्यासमोर आहे. मात्र मला भाजपने कोणती ऑफर दिलेली नाही अशी कबुलीही त्यांनी दिली. येथील खासदार लोकप्रिय आहेत. त्यांनी केलेली कामे लक्षात घेता मतदार संघात फिरल्यावर त्याचा अनुभव येतो, असा उपरोधिक टोलाही त्यांनी दिलीप गांधींना लगावला. आव्हान माझ्यासमोर आहे पण मला निवडणूक लढवायची आहे मी या संदर्भामध्ये माझे वडील राधाकृष्ण विखे यांच्याशी दोन वर्षांपूर्वी बोललो आहे तेंव्हापासून मतदार संघात फिरण्यास सुरुवात केलेली आहे असे त्यांनी स्पष्ट केले. नगर जिल्ह्यामध्ये प्रचार करताना मी कोणालाही समोर आणले नाही. मी वैयक्तिक प्रचार करत आहे असेही त्यांनी सांगितले. माझ्या सभांना मोठी गर्दी होत आहे. वडिलांनी जरी मला निवडणुकीत थांबायला सांगितले तरी मी थांबणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. मी जिल्ह्यामध्ये फिरत आहे. जनतेचे विषय मांडत आहे आणि लोकांचा मला चांगला प्रतिसाद मिळत आहे, म्हणून मी निवडणूक लढणार असल्याचेही ते म्हणाले.

निवडणूक जिंकण्यासाठी लढवली जाते. सध्याचे निकष आणि मागच्या निवडणुकीचे निकष हे वेगळे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस जरी या जागेवर दावा सांगत असली, तरी नवीन निकषांप्रमाणे याचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे. जो पहिला क्रमांक आहे, त्याला उमेदवारी दिली गेली पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली तर तुम्ही उमेदवारी स्वीकारणार का असे विचारल्यावर त्यांनी मला कोणीच विचारत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. उलट त्यांच्याकडूनच रोज नवीन नवीन उमेदवार हा बदलला जात आहे, नवीन नावे पुढे येतात पण मी आजही जिल्ह्यामध्ये फिरत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. नगर शहरामध्ये उद्योगवाढीसाठी ज्या पद्धतीने चालना मिळायला पाहिजे ती मिळत नाही. या ठिकाणी दहशत मोठ्या प्रमाणात आहे म्हणून उद्योजक या ठिकाणी यायला तयार होत नाही. मी निवडून आल्यानंतर निश्‍चितपणे यामध्ये बदल होईल असा दावाही त्यांनी यावेळी केला. मात्र, दहशत कोणाची आहे यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला.