‘आधी कर्जमाफी मग ध्वजारोहण’, सुकाणू समितीचा इशारा

फाइल फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

कर्जमाफी आणि हमीभावाच्या मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा तीव्र करण्याचा इशारा सुकाणू समितीने राज्य सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनांची सुकाणू समिती येत्या १४ ऑगस्टला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करणार आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पालकमंत्र्यांना १५ ऑगस्टला ध्वजारोहण करू देणार नाही, असा इशारा सुकाणू समितीने दिला. मुंबईमध्ये सुकाणू समितीच्या सदस्यांची पत्रकार परिषद झाली. आमदार बच्चू कडू, अजित नवले, रघुनाथ दादा पाटील, किशोर ढमाले यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद झाली.

‘आधी कर्जमाफी आणि मग ध्वजारोहण करा’, असा इशारा सुकाणू समितीने सरकारला दिला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हे राज्य शासनाचे प्रतिनिधी असल्याने त्यांच्याऐवजी शाळेच्या शिपायाच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, असेही सुकाणू समितीने म्हटले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याऐवजी कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांवर जाचक अटी लादण्याचे काम सरकारने केले आहे. सरकारने कर्जमाफी केली नाही, शिवाय इतर मागण्यांवरही गांभीर्याने विचार केलेला नाही, त्यामुळे महाराष्ट्रात चक्का जाम करु, असा इशारा सुकाणू समितीने दिला आहे.

सुकाणू समितीच्या मागण्या –

>राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करावे

>शेतमालाला उत्पादन खर्चासह ५० टक्के हमीभाव द्यावा

>शेतमालावरील निर्यात बंदी उठवावी

>गायीच्या दुधाला ५० रुपये, तर म्हशीच्या दुधाला ६५ रुपये हमीभाव द्यावा

>शेतीला मोफत वीज द्यावी

>शेतकऱ्यांना पीकविमासह मोफत जीवन आणि आरोग्य विमा लागू करावा

>शेतकऱ्यांना ६० वर्ष वयानंतर ३ हजार रुपये निवृत्तीवेतन द्यावे