अझलन शहा हॉकी स्पर्धा – इंग्लंडविरुद्ध हिंदुस्थानला बरोबरीत समाधान

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मलेशियामध्ये सुरू असलेल्या २७ व्या सुलतान अझलन शहा चषक हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात हिंदुस्थानला इंग्लंडसोबत बरोबरीत समाधान मानावे लागले आहे. रविवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडने अखेरच्या क्षणाला केलेल्या गोलमुळे सामना १-१ असा बरोबरीत सुटला आणि हिंदुस्थानने विजयाची संधी गमावली.

सलामीच्या लढतीमध्ये अर्जेंटीनाकडून ३-२ असा पराभव स्वीकारावा लागल्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हिंदुस्थानने सावध सुरुवात केली. पहिले सत्र संपण्यास १ मिनिटांचा अवधी असताना शिलानंद लाक्राने गोल करत हिंदुस्थानला १-० अशी आघाडी मिळवून दिली. हिंदुस्थानी संघाने ही आघाडी तिसऱ्या सत्रापर्यंत कायम ठेवली होती, मात्र चौथ्या सत्रामध्ये ५२व्या मिनिटाला इंग्लंडच्या मार्क ग्लेघोरीनने पेनल्टी कॉर्नवर गोल करत इंग्लंडला बरोबरी साधून दिली.

…तर विजय निश्चित होता
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हिंदुस्थानी संघाला तब्बल ९ पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र एकाही पेनल्टी कॉर्नवर गोल करण्यास हिंदुस्थानला यश आले नाही. या ९ पैकी एक-दोन पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यास यश आले असते तर सामन्याचा निकाल हिंदुस्थानच्या बाजूने लागला असता. रुपिंदरपाल सिंह आणि हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या हिंदुस्थानी संघाचं ड्रॅगफ्लिकींग सेक्शन कमकुवत पडल्याचे स्पष्ठ दिसत होते.