अझलन शहा हॉकी स्पर्धा : हिंदुस्थानने मलेशियाला ५-१ ने चिरडले

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मलेशियामध्ये सुरू असलेल्या अझलन शहा हॉकी स्पर्धेमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात हिंदुस्थानने यजमान मलेशियाचा ५-१ अशा गोल फरकाने धुव्वा उडवला आहे. दोन गोल करणारा गुरजंत सिंग सामन्याचा हिरो ठरला. हिंदुस्थानचा हा स्पर्धेतील पहिला विजय आहे. याआधी दोन सामन्यात पराभव आणि एक सामन्यात बरोबरीवर हिंदुस्थानला समाधान मानावे लागले होते.

ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिनाविरुद्ध झालेल्या पराभवाचे शल्य घेऊन मैदानात उतरलेल्या हिंदुस्थानी संघाने मलेशियाला सुरुवातीपासून दबावात ठेवले. पहिल्या सत्रातील १० व्या मिनिटाला शिलानंद लाकडाने गोल करत हिंदुस्थानला खाते उघडून दिले. सामन्याच्या मध्यांतरापर्यंत हिंदुस्थानने ही आघाडी कायम ठेवली होती.

मध्यांतरानंतर तिसऱ्याच मिनिटाला मलेशियाच्या फैझल सारीने गोल करत स्कोअर बोर्ड १-१ असा बरोबरीत आणला. मात्र या गोलनंतर हिंदुस्थानी खेळाडूंचा झंझावात उपस्थित प्रेक्षकांना पाहायला मिळाला. ४२व्या मिनिटाला गुरजंत सिंगने गोल करत हिंदुस्थानला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सुमित कुमारने ४८व्या, रमनदीप सिंग ५४ आणि गुरजंत सिंगने ५७व्या मिनिटाला गोल करत हिंदुस्थानला ५-१ असा मोठा विजय मिळवून दिला.

याआधी हिंदुस्थानी संघासाठी स्पर्धेची सुरुवात निराशाजनक राहिली होती. पहिल्या सामन्यात अर्जेंटिनाकडून २-३ ने पराभूत झालेल्या हिंदुस्थानने दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला १-१ बरोबरीत रोखले होते. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून २-४ अशा फरकाने पराभव सहन करावा लागला होता.