सुमित राघवन आणि मृणाल कुलकर्णी पहिल्यांदाच एकत्र


सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता सुमित राघवन आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी मालिका, चित्रपट आणि नाटक अशा विविध माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याचा अमीट ठसा उमटवला आहे. मात्र आज पर्यंत कधीही एकत्रित काम केले नव्हते, फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी प्रा. लि. निर्मित आणि प्रोऍक्टिव्ह प्रस्तुत ‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने सुमित राघवन आणि मृणाल कुलकर्णी हे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीत मृणाल कुलकर्णी यांची प्रदीर्घ कारकीर्द आहे, छोट्या पडद्यावरही त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, तर हिंदी आणि मराठी रंगभूमीवर सुमित राघवन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. हिंदी मालिकांमध्ये त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. ‘होम स्वीट होम’ या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोन मोठे कलाकार एकत्र आल्याने त्यांची केमेस्ट्री बघणे प्रेक्षकांसाठी निश्चितच औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच मोहन जोशी आणि सुमित राघवन सुद्धा मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत, ऐंशीच्या दशकात एका मालिकेत त्यांनी एकत्र काम केले होते. घर आणि घरातील माणसांच्या नातेसंबंधावर भाष्य करणारा ‘होम स्वीट होम’ चित्रपट घराविषयीच्या अनेक रंजक कल्पना आणि भावनाप्रधान घटनांचा साक्षीदार आहे.

‘होम स्वीट होम’ मध्ये सुमित राघवन आणि मृणाल कुलकर्णीसह रीमा, मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषीकेश जोशी, विभावरी देशपांडे, क्षिती जोग, प्रसाद ओक आदी कलाकार आहेत. शिवाय या चित्रपटातून सुप्रसिद्ध अभिनेते हृषीकेश जोशी यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. चित्रपटाची कथा वैभव जोशी, हृषीकेश जोशी आणि मुग्ध गोडबोले यांची आहे, तर संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर आहेत. हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर हे चित्रपटाचे निर्माते असून आकाश पेंढारकर आणि विनोद सातव हे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘होम स्वीट होम’ हा चित्रपट येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

summary- sumeet raghavan and mrinal kulkarni to act together