अभिनेता सुमित राघवनने गायलं ‘वेलकम होम’मध्ये गाणं!!


सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता सुमित राघवन हा उत्तम गायक आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्याने संगीत नाटकात कामही केलं आहे. मात्र पहिल्यांदाच त्यानं चित्रपटातही गाणं गायलं आहे. ‘वेलकम होम’ या चित्रपटात सुमितनं ‘राधे राधे’ हे गाणं गायलं असून, विशेष म्हणजे, बंगाली शैलीत असलेलं गाणं सुमितनं कोणत्याही वाद्यांच्या साथसंगतीविना गायलं आहे. 14 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

चित्रपटाची निर्मिती अभिषेक सुनील फडतरे, विनय बेळे, अश्विनी सिधवानी, दीपक कुमार भगत यांनी केली आहे. तर चित्रपटात मृणाल कुलकर्णीसह सुमित राघवन, स्पृहा जोशी, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, डॉ. मोहन आगाशे, प्रसाद ओक,  उत्तरा बावकर, सेवा चौहान, सिद्धार्थ मेनन, मिलिंद फाटक, इरावती हर्षे, दीपा श्रीराम, अश्विनी गिरी, रेणुका दफ्तरदार, श्रुती अत्रे, शाल्व किंजवडेकर, प्रांजली श्रीकांत अशी उत्तम स्टारकास्ट आहे. चित्रपटाचं लेखन सुमित्रा भावे यांचं असून, सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शन केलं आहे. पार्थ उमराणी यांनी संगीत, सुनील सुकथनकर यांनी गीतलेखन, मोहित टाकळकर यांनी संकलन, धनंजय कुलकर्णी यांनी छायांकन, तृप्ती चव्हाण यांनी कला दिग्दर्शन, साकेत कानेटकरनं पार्श्वसंगीत केलं आहे.

‘चित्रपटात गाण्याची दोन व्हर्जन्स आहेत. त्यातलं एक व्हर्जन मला गाण्याची संधी मिळाली. अत्यंत श्रवणीय असं हे गाणं आहे. गाण्याचं दुसरं व्हर्जन चित्रपटात पार्श्वगीत म्हणून येतं. या गाण्यामुळे पहिल्यांदाच चित्रपटात गाणं गाता आलं,’ असं सुमित म्हणाला. ‘चित्रपटात माझी सुरेश नावाची व्यक्तिरेखा आहे. खूप छान प्रकारे ही व्यक्तिरेखा लिहिली गेली आहे. एका दिवसात घडणारी ही गोष्ट आहे. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांच्यासह, मृणाल कुलकर्णी, डॉय मोहन आगाशे, उत्तरा बावकर यांच्यासारख्या कलाकारांसह काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट म्हणजे खूप छान अनुभव होता.’ असंही सुमितनं सांगितलं.

पाहा व्हिडीओ-