सुनील कर्वे यांचे एमआयटीवर वर्चस्व


सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई एज्युकेशन ट्रस्टचे (एमईटी) संस्थापक विश्वस्त आणि या ट्रस्टचे सीए असलेले एमईटीचे व्हाइस चेअरमन सुनील जी. कर्वे यांची एमईटीच्या विश्वस्त पदावरून कायमची हकालपट्टी करण्यासाठी भुजबळ कुटुंबीयांनी पास केलेला ठराव सहाय्यक धर्मदाय आयुक्त मोहन गाडे यांनी आज फेटाळून लावला.

एमईटीमधील 178 कोटींच्या गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराला छगन भुजबळ आणि त्यांचे कुटुंबीयच जबाबदार असल्याची तक्रार सुनील कर्वे यांनी धर्मादाय आयुक्त आणि राज्याच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे (ईओडब्ल्यू) केली होती. 1 फेब्रुवारी 2012 रोजीच्या तक्रारीमुळे संतप्त झालेल्या भुजबळ कुटुंबीयांनी कर्वे यांची एमईटीच्या विश्वस्तपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यासाठी एक ठरावही पास केला.

हे प्रकरण धर्मादाय आयुक्तांकडे प्रलंबित असतानाच पंकज भुजबळ यांनी कर्वे यांच्या हकालपट्टीचे समर्थन करणारा दुरुस्ती अहवाल सादर केला; परंतु सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी हा अहवाल बेकायदा ठरवत रद्दबातल केला. त्यामुळे कर्वे यांचा पुन्हा एकदा संस्थापक विश्वस्त आणि व्हाइस चेअरमन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.