कचऱयात उमलले  ज्ञानाचे कमळ   

10

संजीवनी धुरी-जाधव        

सुनील यादव… मुंबई महापालिकेत सफाई कामगार पण ज्ञानाची, शिक्षणाची ओढ आज सुनीलला थेट कोलंबिया विद्यापीठात घेऊन गेली आहे… नुकताच सुनीलने आपल्या पीएच.डीचा प्रबंध येथे सादर केला…

प्रचंड मेहनत करण्याची तयारी… शिकण्याची जिद्ध… ज्ञानाची आस आणि यशस्वी होण्यासाठीचे प्रयत्न उराशी असतील तर कुठल्याही परिस्थितीच्या बेडय़ा आड येत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगार सुनिल यादव. परिस्थिती बेताची त्यात पाठिवर कोणाचाही वरदहस्त नसताना केवळ शिकण्याच्या ध्यासाने थेट कोलंबियात भरारी मारली आहे. त्यांच्या या कर्तुत्वाने त्यांनी जगासमोर आदर्श निर्माण करुन दिला आहे.

सुनील यादव हे डी विभाग नाना चौक, ग्रॅण्डरोड येथील मुंबई महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागातील कायमस्वरुपी कर्मचारी आहेत. पत्नी आणि दोन लहान मुली असा त्यांचा परिवार आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले आहे. झोपडपट्टीत बालपण गेल्याने ज्या परिसरात राहायचो तिथे सर्रास गुन्हेगारी चालायची. खून, चोऱयामाऱया नेहमीचे असायचे. अशा वातावरणात मी वाढलो आणि कसेबसे दहावीपर्यंत पोहोचलो पण दहावीत नापास झालो. त्यात वडिलांना पॅरेलिसिस झाला आणि त्यांनी अंथरुण धरले. आई आयांची कामं करून कसेबसे कुटुंब चालवत होती. अशावेळी मोठा भाऊ म्हणून माझ्यावर जबाबदारी आली. पुढे काय करायचे काहीच माहीत नव्हते. शिक्षण नाही त्यामुळे काम तरी कसे मिळणार अशावेळी मिळेल ते काम करू लागलो. उपहारगृहात टेलिफोन ऑपरेटर, कुरिअर बॉय अशी अनेक लहान मोठी कामं केली. त्यातून आईला थोडा हातभार लागत असल्याचे सुनील सांगतात. अथक प्रयत्नानंतर २००५ साली पालिकेत सफाई कामगार म्हणून रुजू झालो. सफाई करताचा पहिला दिवस आजही लक्षात आहे.

मैला साफ करायचा विचार करून अंगावर काटा आला, पण सोबत जे कर्मचारी होते त्यांनी थोडे सावरले. विचार करत बसू नको नाहीतर त्रास होईल. पण त्यादिवशी काम केले आणि न जेवताच झोपून गेलो. आपण यातून बाहेर पडायचे असा निश्चय केला होता. त्याच दरम्यान लग्न झाले. पुन्हा जबाबदारी वाढली. भविष्य उज्वल करायचे असेल तर शिकणे गरजेचे आहे आणि मग कामाच्या मधल्या वेळेत वाचनाची सवय लागली. मिळेल त्या वेळेत वाचत बसायचो. पण पेपर विकत घेऊन वाचणे शक्य नव्हते अशावेळी वाचनालयाजवळ जाऊन वेगवेगळे पेपर वाचत बसायचो. राजकीय, सामाजिक क्षेत्रातल्या बातम्या वाचायला आवडायच्या. जिथे पेपर वाचायला जायचो तिथे मला कळले की यशवंतराव विद्यापीठातून शिक्षण घेता येते. ग्रॅण्टरोडजवळच्या परिसरातच ते विद्यापिठ असल्याने तिथे जाऊन चौकशी केली आणि कॉर्मस ऍडमिशन घेतले. त्यानंतर अर्थव्यवस्थेबद्दल कळायला लागले. त्यात आवड निर्माण झाली. पण आता थांबायचे नव्हते. शिक्षणातून स्वतःला सिद्ध करायचे होते. २००८ साली यशवंतराव विद्यापिठातून शिक्षण घेऊन जर्नलिझममध्ये बी.ए. पूर्ण केल्याचे ते सांगतात.

सामाजिक कार्याची आवड असल्याने निर्मला निकेतनमधून डीएसडब्ल्यू करायची ईच्छा झाली. त्यासाठी चौकशी करायला गेलो तर तुम्हाला इंग्रजी येतं का.. येत नसेल तर तुम्ही ऍडमिशन नका घेऊ असे सल्ले देऊ लागले. शेवटी मला अर्ज द्या मी काय करायचे ते बघतो असे सांगितले. परिक्षा झाली बाराशे शब्दात बायोग्राफी लिहायची होती त्यात नापास झालो. पण हिंमत हरलो नव्हतो. त्याच्यापेक्षा जास्त जोमाने पुढच्यावर्षी प्रयत्न करायचे. दुसऱया वर्षीही तसेच झाले, पण मला ते वर्ष वाया घालवायचे नव्हते. दरम्यान एकदा रस्त्यात वडिलांचे मित्र भेटले आणि त्यांनी मला निर्मला निकेतनमध्ये एका प्राध्यापकांना भेटायला सांगितले. प्राध्यापकांना भेटल्यानंतर त्यांनी मला डीएसडब्ल्यू करण्याचा सल्ला दिला. प्रेझेंटेशन कसे करायचे, असाईनमेण्ट कशा लिहायच्या त्यातून तुझी ओळख होईल आणि त्या दिशेने मी प्रवास करायला लागलो. सकाळी काम आणि नंतर अभ्यास असा दिनक्रम सुरु झाला. सुरुवातीला शिकवलेले काहीच समजत नव्हते पण हळूहळू समजायला लागले होते. तिथे दिंगबर नावाचा मित्र भेटला त्याच्याकडून मी समजून घ्यायला लागलो, असे ते म्हणाले.

कोलंबिया विद्यापीठात प्रबंध

माझ्या मित्राने महाराष्ट्र पुणे विद्यापिठातून एमएसडब्ल्यू शिकवले जात असल्याचे सांगितले आणि त्याची शाखा बेलापूरला असल्याचे कळले. तिथून मी एमएसडब्ल्यू केले. मराठी मुलं असल्याने तिथे त्रास झाला नाही. मराठीमध्ये असल्याने लवकर समजत होते. पण टाटा इन्स्टिटय़ूटचे डोक्यात होते. अनेक अडचणींवर मात करत अखेर टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्स येथून  ग्लोबलायझेन या विषयात एम.ए. केले. त्यानंतर टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्स येथून एम. फिलसाठी ऍडमिशन घेतले. तरीही त्यांनी सफाईचे काम सुरूच ठेवले आहे.

ते म्हणाले, टाटा इन्स्टिटय़ूट येथे १२-१४ साली एम.ए. इन ग्लोबलायझेशनमध्ये प्रवेश घेतला. नंतर मी एम.फिल-पीएचडी घेतली. एमहर्स्ट मासाचुसेट्स युनिव्हर्सिटी, , अमेरिका आणि बोस्टन ग्रुप यांच्या unfinished legacy of Dr. B. R. Ambedkar (race and caste) आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रबंध सादर केला. माझे मित्र विशाल ठाकरे यांच्यामुळे शक्य झाले. नंतर कोलंबिया विद्यापिठाला येथे भेट दिली. नंतर न्यूयॉर्क येथील यूएन मुख्यालयातील मुख्य सभागृहास भेट देता आली.

टाटा इन्स्टिटय़ूटचे व्याख्याते

सुनील यादव यांनी यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून २००५-२००८ मध्ये बी.कॉम.नंतर महाराष्ट्र टिळक विद्यापीठातून सामाजिक शास्त्र या विषयात एम.ए. ही पदवी घेतली. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून त्यांनी राज्य धोरण आणि कामगार या विषयात एमफिल केले. सध्या ते ‘व्यवस्थापन आणि कामगार’ या विषयात पीएचडी करीत आहेत. सुनील यादव हे दिवसा टाटा इन्स्टिटयूटमध्ये व्याख्याते आणि रात्री सफाई कामगार असे जीवन जगत आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या