ढाई किलो का हाथ भाजप के साथ, सनी देओलचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

1

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

बॉलीवूड अभिनेता सनी देओल याने अखेर भाजपमध्ये जाहीररित्या प्रवेश केला आहे. सनी देओल याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंड भरून यावेळी कौतुक केले. ‘मोदींनी या देशासाठी बरंच काही केलं असून पुढची पाच वर्ष त्यांनाच सत्ता मिळाली पाहीजे’ असे मत सनी देओल याने व्यक्त केले. ‘माझे वडील अटल बिहारी वाजपेयींपासून भाजपसोबत जोडले गेले आणि मी नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपसोबत जोडलो गेलोय’ असेही सनी देओल म्हणाला.

सनीने रविवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भेट घेतली होती. या भेटीनंतर सनी देओलच्या भाजपप्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली होती. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत त्याने हा प्रवेश केला. यावेळी अर्थमंत्री पियुष गोयल हे देखील उपस्थित होते. सनी देओल यांचे वडील धर्मेंद्र हे भाजपमध्येच असून ते खासदार राहिलेले आहेत. धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी या देखील भाजपमध्ये असून त्यांना मथुरा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

सनीने पंजाबमधून निवडणूक लढवावी अशी अमित शहा यांची इच्छा आहे. यासाठी त्यांची सनीबरोबर चर्चा सुरू आहे. दरम्यान,सनीचे राजकारणात येणे धर्मेंद्र यांना पसंत नसल्याचे कळते. सनी याला पंजाबमधील गुरदासपूर आणि अमृतसर यासारख्या प्रतिष्ठेच्या लोसभामतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.