विनभंग प्रकरणी ४८ दिवसांत शिक्षा

सामना प्रतिनिधी । कर्जत

विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीला ४८ दिवसांतच शिक्षा सुनावण्यात आल्याची घटना कर्जत तालुक्यात घडली आहे. प्रथम न्याय दंडाधिकारी ध. ज. पाटील यांनी आरोपीला एक वर्ष सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम पीडितेला देण्याचा आदेशही त्यांनी दिला आहे. दरम्यान, या खटल्याचा निकाल अतिजलद गतीने लागल्याने ‘कोपर्डी’ अत्याचार व खून खटल्याचा निकालही अशाच जलद गतीने लागावा, अशी अपेक्षा कर्जत तालुक्यातील रहिवासी व्यक्त करीत आहेत. सुनील त्र्यंबक गाढवे (वय २७, रा. चखालेवाडी, ता. कर्जत) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

२३ ऑगस्ट २०१७ रोजी पीडित महिला गावातील ओढय़ावरून कपडे धुऊन घरी परतत असताना आरोपी गाढवे याने या महिलेचा विनयभंग केला होता. पीडित महिलेने आरडाओरडा केल्याने आरोपीने तिचा गळा दाबून खून करण्याचाही प्रयत्न केला होता. यावेळी झालेल्या झटापटीत पीडित महिलेचे मंगळसूत्रही गहाळ झाले होते. त्याचवेळी गावातील दुसरी महिला तेथे आल्याने आरोपीने तेथून पळ काढला होता. यानंतर त्याच दिवशी पीडित महिलेने कर्जत पोलिसांत फिर्याद दिली होती. पोलीस निरीक्षक वसंत भोये यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल डी. एस. भापकर यांना आदेश दिल्यानंतर काही तासांतच आरोपीला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्याच दिवशी दोषारोपपत्राचे काम पूर्ण करून दुस-या दिवशी आरोपीला न्यायालयात हजर केले.

खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. यापैकी तीन साक्षीदार फितूर झाले. मात्र, कर्जतचे प्रथम न्यायदंडाधिकारी ध. ज. पाटील यांनी फिर्यादी डॉ. जगताप, पोलीस नाईक करुंद, हेडकॉन्स्टेबल डी. एस. भापकर यांची साक्ष ग्राह्य मानत आरोपी गाढवे याला कलम ३५४ नुसार एक वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरी, कलम ५०६ प्रमाणे सहा महिने सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम पीडित महिलेला देण्याचे आदेश न्याय दंडाधिकारी पाटील यांनी दिले आहेत. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील गहिनीनाथ नेवसे यांनी काम पाहिले. कर्जत न्यायालयाच्या नव्हे तर जिह्यात किंवा राज्यातही महिला अत्याचाराविरोधात जलद गतीने खटल्याचा निकाल लागण्याची ही दुर्मिळ घटना आहे.