नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी शिवसेनेला साथ द्या, आदित्य ठाकरे यांचे आवाहन

सामना ऑनलाईन । नाशिक

जनतेच्या शिवसेनेवरील प्रेमाला व विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी शिवसेनेबरोबर असेच कायम रहा, साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

नाशिकजवळील भगूर येथे शनिवारी बसस्थानक नूतनीकरण व भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आदित्य ठाकरे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, येथील बसस्थानक नूतनीकरण कामाचे भूमिपूजन करताना आनंद होत आहे. मी कालपासून नाशिक जिह्यात फिरतो आहे. मालेगाव, नांदगाव यासह ठिकठिकाणी युवक, महिलांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला. देवळाली मतदारसंघात सलग सहा वेळा भगवा डौलाने फडकत आहे, असाच तो महाराष्ट्रातील इतर मतदारसंघातही फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. साडेचार वर्षांपासून केंद्रात आणि महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत आहे, पण शिवसेना लोकांसाठी काम करते आहे. सत्तेत असली तरी लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी, शेतकऱयांच्या, तरुणांच्या प्रश्नांसाठी लढत आहे. आम्ही सामाजिक बांधिलकीतून आरोग्य शिबीर, मुलींसाठी स्व-संरक्षण कार्यक्रम घेत आहोत. पुढची भगवी सत्ता आहे. नागरिकांनी शिवसेनेवर केलेले प्रेम आणि ठेवलेला विश्वास याला तडा जाऊ देणार नाही. नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी असेच शिवसेनेबरोबर कायम रहा, असे आवाहन त्यांनी केले.