कश्मीरमध्ये संपत्ती खरेदीबाबत सुनावणीला आज स्थगिती

supreme-court

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बाहेरच्या राज्यातील लोकांना जम्मू कश्मीरमध्ये अचल संपत्ती खरेदी करण्यासाठी रोखणाऱ्या राज्यघटनेच्या कलम ३५ ए ला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीला आज सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यात आली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी २७ ऑगस्ट रोजी घेण्यात येणा आहे.

दरम्यान, या सुनावणीचा विरोध करण्यासाठी फुटीरतावादी संघटनांनी सोमवारी दुसऱ्या दिवशीही बंदचे आवाहन केले आहे. कलम ३५ ए ला आव्हान देण्याच्या विरोधात रविवारी अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. तसेच खोऱ्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

या याचिकेवरील सुनावणी रद्द करण्यात यावी, अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, माकपा, काँग्रेससह जम्मू कश्मीरमधील अनेक राजकीय पक्षांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी फुटीरतावाद्यांच्या बंदलाही पाठिंबा दिला आहे. राज्यातील पंचायत आणि नगर पालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे. त्यामुळे वातावरण तापू नये, यासाठी कलम ३५ ए विरोधातील सुनावणी रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाची सुनावणी संविधान पीठात घेण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत ‘वी द सिटीजन’ या स्वंयसेवी संस्थेने केली आहे. तसेच या याचिकेवरील सुनावणी रद्द करू नये, अशीही संस्थेची मागणी आहे. या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यात येणार आहे.