सुप्रिमो चषकाचा धमाका नऊ एप्रिलपासून

विजेत्यावर होणार पाच लाख दहा हजार रुपयांचा वर्षाव

खुल्या गटात १६ संघांमध्ये जेतेपदाची चुरस

मुंबई :

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून ‘सुप्रिमो चषक’ ही टेनिस चेंडूने खेळविण्यात येणारी स्पर्धा सुरू करण्यात आली. गेली सहा वर्षे या स्पर्धेला दणदणीत प्रतिसाद लाभला असून आता सातव्या मोसमाचे बिगुलही दणक्यात वाजले आहे. हिंदुस्थानातील प्रतिष्ठेची समजली जाणारी ‘सुप्रिमो चषक’ क्रिकेट स्पर्धा यंदा ९ एप्रिलपासून सांताक्रुझ येथील एअर इंडियाच्या ग्राऊंडवर खेळविली जाणार आहे. शिवसेनेचे विभागप्रमुख – आमदार संजय पोतनीस व शिवसेनेचे विभागप्रमुख-आमदार ऍड. अनिल परब यांच्या पुढाकारामुळे आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या संघावर ५ लाख १० हजार रुपयांचा वर्षाव करण्यात येणार आहे. उपविजेता संघ ४ लाख १० हजार रुपयांचा मानकरी ठरेल. शिवसेना व राजेंद्र स्पोर्टस् क्लब यांचाही स्पर्धेच्या आयोजनात सिंहाचा वाटा आहे.

यावर्षी ९ ते १६ एप्रिल या कालावधीत खेळविण्यात येणाऱ्या या स्पर्धेत हिंदुस्थानातील बलाढ्य संघ सहभागी होणार आहेत. ९ ते ११ एप्रिल या कालावधीत आंतर सांताक्रुझ-कलिना विधानसभा स्पर्धा तर १२ ते १६ एप्रिल या कालावधीत सुप्रिमो चषक खुल्या गटातील स्पर्धा रंगणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या स्पर्धेला स्टार व्यक्तींची उपस्थिती लाभली होती. त्यामध्ये हिंदुस्थान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, करसन घावरी, चंद्रकांत पंडित, किरण मोरे, प्रवीण अमरे, नरेंद्र हिरवाणी, लालचंद राजपूत तसेच मोहम्मद कैफ, आर. पी. सिंग, अमोल मुजुमदार, वासीम जाफर या स्टार क्रिकेटपटूंचा समावेश होता. याही वर्षी सिने कलावंत व क्रिकेटपटू यांची उपस्थिती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

सर्वोत्तम खेळाडूला मिळणार आलिशान कार

या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला आलिशान कार बक्षिसाच्या रूपात देण्यात येणार आहे. या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडत संघाला जेतेपदाची स्वप्न दाखवणाऱ्या खेळाडूला मोटार बाईक देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्तम गोलंदाजाला स्कूटी बक्षीस म्हणून बहाल करण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रत्येकी आठ षटकांचे सामने खेळविण्यात येणार आहेत.

सोशल नेटवर्किंग साइटवर लढतींचे अपडेट

या वर्षी या स्पर्धेने एक पाऊल पुढे टाकले असून सोशल नेटवर्किंग साइटवरही यामधील लढतींचे अपडेट करण्यात येणार आहेत. यामध्ये फेसबुक, ट्विटर, इन्स्ट्रागाम, यू टय़ूब या साइटचा समावेश आहे. यावर स्पर्धेबाबतची माहितीही तमाम क्रिकेटप्रेमींना मिळेल तसेच रेड एफएमवरही या स्पर्धेचा लेखाजोखा ऐकायला मिळणार आहे.

पाकिस्तानी संघाला नकार

या वर्षी श्रीलंका, ओमान, दुबई या देशांतील संघांनीही सुप्रिमो चषकमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले होते, पण कायदेशीर कारणामुळे त्यांना यामध्ये सहभागी होता आले नाही. पाकिस्तानातील संघालाही यामध्ये खेळण्याची इच्छा होती. पण त्यांना स्पष्टपणे नकार सांगण्यात आला.

सुप्रिमो चषक >

खुल्या गटातील संघ :

एकता (गुजरात)

तिरुपती सावर्डे (चिपळूण)

स्टार सीसी (पालघर)

वैष्णवी, कोलाड (रायगड)

मराठा पंजाब, विनर (भिवंडी)

यश लायन (छत्तीसगढ)

शांती रत्न, प्रतीक इलेव्हन (पुणे)

अर्जुन संघटना (नागपूर)

सारा इंडिया (कोलकाता)

शिरवणे सॅण्डी एसपी, दादर (मुंबई)

राजेंद्र इलेव्हन (मुंबई)

विक्रोलीयन्स (मुंबई)

ट्रायडंट (उमर इलेव्हन, मुंबई)

दहिसर बॉईज (मुंबई)

ब्रह्मा शिवशक्ती पार्ले (मुंबई)

उमेश ऍण्ड जिया इलेव्हन (मुंबई)

 

आंतर सांताक्रुझकलिना विधानसभा गटातील संघ :

वायएनसीसी

विनोद इलेव्हन

नटराज

वंडर बॉईज

युगांधर

दत्त मंदिरचा राजा

उत्कर्ष

गावदेवी इलेव्हन

पी. आर. एस. इलेव्हन

साई माऊली

डिगवेल

कुंची कुर्वे

अहमद इलेव्हन

शाखा क्रमांक १६५

अंतरा इलेव्हन